खाजगी शिकवणीच्या फीमध्ये शेतकऱ्यांच्या पाल्यांना सवलत द्या – भागवत देवसरकर

0
8

नांदेड दि. 28 -शैक्षणिक क्षेत्रामध्ये गुणवत्तेसाठी प्रचंड स्पर्धा लागली असून त्या स्पर्धेतूनच खाजगी शिकवणीच्या क्लासेसकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढला असून शेतकऱ्यांच्या मुलांना मात्र खाजगी शिकवणी क्लासेसची फी परवडणारी नाही. त्यामुळे नांदेडमधील सर्वच खाजगी शिकवणी घेणाऱ्या क्लासेसवाल्यांनी शेतकऱ्यांच्या पाल्यांना फीमध्ये सवलत द्यावी, अशी आग्रही मागणी व विनंती पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष भागवत देवसरकर यांनी जिल्हाधिकारी नांदेड व खाजगी कोचिंग क्लासेस संघटना (पीटीए) यांच्याकडे केली आहे.
गेल्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांना दुष्काळ, अवकाळी पाऊस, कमी पाऊस व यावर्षी बोंडआळीने थैमान घातल्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बेताची झाली आहे. त्यातच जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांची पाल्ये हे खाजगी शिकवणीच्या क्लासेसकरिता नांदेड शहरात राहात आहेत. सर्वच खाजगी कोचिंग क्लासेसवाल्यांनी फीमध्ये वाढ केल्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलांना ही फीस न परवडणारी झाली आहे. अनेक शेतकऱ्यांची पाल्ये गुणवान व क्लास करण्याची इच्छा असूनही पैशाअभावी आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे खाजगी शिकवणीचे क्लास करू शकत नाहीत. त्यामुळे सर्वच खाजगी कोचिंग क्लासेसधारकांनी शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून शेतकऱ्यांच्या पाल्यांना खाजगी शिकवणीच्या फीसमध्ये सवलत द्यावी, अशी विनंती व आग्रही मागणी भागवत देवसरकर यांनी केली.
निवेदनावर जिल्हाध्यक्ष विनीत पाटील, महानगराध्यक्ष परमेश्वर काळे, आत्माराम शिंदे, दीपक पवार, श्रीकांत शिंदे, शिवशंकर थोटे, सतीश चव्हाण, अमोल पा.वाघीकर, दिनेश जाधव, अमोल शिंदे, संदीप वानखेडे, सतीश जाधव, साहेबराव सूर्यवंशी, शिवराज पवार, दत्ता जाधव, जनार्दन पा.वडवळे, कपिल तडकिले, नंदू जोगदंड, रामदास माळेगावे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.