शेअर बाजार ‘घाबरला’, ६०० अंशांनी कोसळला!

0
9

मुंबई-अमेरिकेत व्याजाचे दर वाढण्याच्या शक्यतेनं जगभरातील शेअर बाजार गडगडले असताना, भारताच्या शेअर बाजारातही भीतीचं सावट दिसलं. सकाळपासूनच घसरणीला लागलेला सेन्सेक्स, बाजार बंद होताना ६०४ अंशांनी कोसळला, तर निफ्टी १८१ अंशांनी घसरला. त्यात बँका आणि मेटल कंपन्यांच्या शेअर्सची सपाटून विक्री झाली.

अमेरिकेत बेरोजगारीचं प्रमाण घटल्याचं ताज्या आकडेवारीतून समोर आलं आहे. त्यामुळे अमेरिकी अर्थव्यवस्थेला बळकटीच मिळणार आहे. परंतु त्याचवेळी, या संधीचा फायदा घेऊन फेडरल रिझर्व्ह ही अमेरिकेची शिखर बँक व्याजदर वाढवू शकते, असा अंदाजही व्यक्त होतोय. ही दरवाढ भारतासारख्या अनेक उगवत्या बाजारांसाठी नकारात्मकच ठरणारी असल्यानं जगातील शेअर बाजारांमध्ये निराशेचं वातावरण पाहायला मिळालं. त्याचे पडसाद अर्थातच भारतातही उमटले. बड्या गुंतवणूकदारांनी धोका पत्करण्याऐवजी, विक्रीचा मार्ग स्वीकारल्यानं शेअर बाजार आपटला.

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक आणि निफ्टीला सकाळपासून जी उतरती कळा लागली, त्यातून ते शेवटपर्यंत सावरलेच नाहीत. किंबहुना, कामकाज संपता-संपता अधिकच गडगडले. हिंदाल्को, आयसीआयसीआय बँक, सेसा स्टरलाइट, भेल, गेल, अंबुजा सिमेंट, अल्ट्राटेक सिमेंट, अॅक्सिस बँक, टाटा पॉवर, एनटीपीसी या कंपन्यांना शेअर विक्रीचा जबरदस्त तडाखा बसला. या कंपन्यांच्या शेअरमध्ये ३ ते ४.५ टक्क्यांची घसरण झाली. दिवसअखेर सेन्सेक्स ६०४ अंशांनी कोसळून २८,८४५ अंशांवर बंद झाला, तर निफ्टी ८,८००च्याही खाली आला.