बांगलादेशचा इंग्लंडवर 15 धावांनी रोमहर्षक विजय

0
9

ऍडलेड – बांगलादेशने अचूक गोलंदाजी आणि योग्य क्षेत्ररक्षण करीत इंग्लंडच्या संघाला 275 धावांचे शक्य असे आव्हान गाठण्यापासून रोखत रोमहर्षक विजय मिळवत विश्वकरंडक स्पर्धेतील आपले आव्हान कायम राखले.

इंग्लंडकडून खालच्या फळीत खेळायला येऊन वोक्सने प्रत्येक चेंडूमागे धाव जमविताना बटलरला चांगली साथ दिली. या दोघांच्या भागीदारीमुळे इंग्लंडला विजय आवाक्यात आला होता. मात्र, तस्किन अहमदच्या चेंडूवर बटलरने मारलेला चेंडू मुशफिकूरने झेलत त्याला बाद केले. तसेच, जॉर्डनला थर्ड अंपायर धावबाद ठरविले. त्यानंतर रुबेल हुसेन याने ब्रॉड आणि अँडर्सनचे त्रिफळे उडविल्याने 260 धावांमध्ये इंग्लंडचा डाव संपुष्टात आला.

महमुदुल्लाहचे शतक (103 धावा) आणि मुशफिकूर रहिमच्या अर्धशतकी (89 धावा) खेळीमुळे बांगलादेशने इंग्लंडसमोर विजयासाठी 276 धावांचे आव्हान ठेवले आहे.

बाद फेरी गाठण्यासाठी ‘करो या मरो‘ अशी स्थिती असलेल्या इंग्लंडला आज (सोमवार) बांगलादेशच्या आव्हानाला सोमोरे जावे लागत आहे. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार इयान मॉर्गनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. विश्वकरंडकात आतापर्यंत लय न सापडलेल्या जेम्स अँडरसनला या सामन्यात लय सापडली. अँडरसनने बांगलादेशचे सलामीवीर तामिम इक्बाल आणि इमरुल कायस यांना बांगलादेशच्या अवघ्या 8 धावा असताना पॅव्हेलियनमध्ये पाठविले. बांगलादेशची 2 बाद 8 अशी दयनीय अवस्था असताना मैदानात आलेल्या सौमया सरकार आणि महमुदुल्लाह यांनी संघाचा डाव सावरला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 86 धावांची भागीदारी केली. सरकार 40 धावांवर बाद झाल्यानंतर शकीब अल हसनही 2 धावांवर बाद झाला. त्यामुळे पुन्हा बांगलादेश अडचणीत आले आणि 4 बाद 99 अशी स्थिती झाली. त्यावेळी फलंदाजीस आलेल्या मुशफिकूर रहिमने महमुदुल्लाह याच्यासह इंग्लंडच्या गोलंदाजांना आणखी यश मिळू दिले नाही. या दोघांनी 141 धावांची भागीदारी करून बांगलादेशला मोठ्या धावसंख्येकडे नेले. दरम्यान, महमुदुल्लाहने एकदिवसीय कारकिर्दीतील पहिले शतक पूर्ण केले. त्याने 138 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकारासह 103 धावा केल्या. मुशफिकूरही शतकाच्या वाटेवर असताना शेवटच्या षटकांमध्ये फटकेबाजीच्या प्रयत्नात झेल देऊन 89 धावांवर बाद झाला. त्याने 77 चेंडूत 8 चौकार आणि 1 षटाकारासह 89 धावा केल्या. या दोघांच्या खेळीमुळे बांगलादेशला इंग्लंडपुढे विजयासाठी 276 धावांचे आव्हान ठेवता आले.