माजी नगरसेवक एन.यु. सदावर्ते यांचे निधन

0
12

नांदेड,दि.१७ः- येथील आंबेडकरी चळवळीतील धडाडीचे नेते माजी नगरसेवक एन. यु.सदावर्ते यांचे रविवार दि. १६ डिसेंबर रोजी सकाळी साडे सात वाजता हदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.मृत्यूसमयी ते ७१ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी सौ. भारती बाई सदावर्ते, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.मुंबई येथील प्रख्यात विधिज्ञ अॅड. गुणरत्न सदावर्ते व प्रसिद्ध चेस्ट फिजिशियन डॉ.राजरत्न सदावर्ते यांचे ते वडील होत. मानवी हक्क आयोगाच्या माजी संशोधन अधिकारी अॅड. सौ. जयश्री सदावर्ते पाटील यांचे ते सासरे होत.
एन. यु.सदावर्ते हे प्रभात नगर सहकारी गृहनिर्माण संस्थेचे जवळपास २५ वर्षे चेअरमन होते. तत्कालीन नगरपालिकेत त्यांनी दोन वेळा प्रभातनगर वॉर्डाचे प्रतिनिधीत्व केले होते. त्यानंतर त्यांच्या मातोश्री स्मृतीशेष द्रोपदाबाई सदावर्ते या निवडून आल्या होत्या. महानगरपालिकेच्या निवडणूकीत सदावर्ते विजयी झाले होते.फुले शाहू आंबेडकर चळवळीत त्यांनी स्वःताला झोकून दिले होते. सतत हसरे व्यक्तीमत्व, लोकांच्या सुखा दुःखात धाऊन जाऊन मदत करणारा नेता अशी त्यांची ख्याती होती.एन.यु.सदावर्ते व सौ. भारती बाई सदावर्ते यांनी धम्म चळवळीत हिरिरीचा सहभाग घेऊन धम्म चळवळ रुजविली आहे. चळवळीतील सर्व सामान्यांना हिंम्मत देणारा नेता अशी त्यांची ओळख होती.
आज सकाळी साडे सात वाजता त्यांना हदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारापुर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली.
स्मृतीशेष एन. यु. सदावर्ते यांनी देहदानाचा संकल्प केला होता.त्यानुसार पार्थिव देह डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे सुपुर्त करण्यात आला.