वाहनचालकांची पदे कंत्राटदारामार्फत भरू नका

0
8

 

गोंदिया,दि.22 : कंत्राटदार वाहनचालकांना सहा-सहा महिने पगार व सेक्युरिटीची रक्कम देत नाही. त्यामुळे कुटुंबावर उपासमारील पाळी ओढवते. ही बाब लक्षात ठेवून जि.प. गोंदिया आरोग्य विभागातील कंत्राटी वाहन चालकांची पदे कंत्राटदारामार्फत भरण्यात येवू नये, अशी मागणी सर्व कंत्राटी वाहनचालकांनी पालकमंत्री व वरिष्ठ अधिकार्‍यांना केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, आरोग्य विभाग जि.प. गोंदिया येथील सर्व कंत्राटी वाहनचालक प्राथमिक आरोग्य केंद्र, तालुका नियंत्रण पथक, भरारी फिरते पथक येथील कार्यालायत सन २00६ पासून कार्यरत आहेत. त्यांची नियुक्ती कंत्राटदारामार्फत देऊन त्यांना मानधनही कंत्राटदार देत होते. मात्र कंत्राटदार वाहनचालकांच्या १00 टक्के मानधनातून ५0 टक्के मानधन स्वत: घेत होता व १00 टक्के मानधनावर सह्या घेऊन वाहनचालकांची फसवणूक करीत होता. त्यामुळे दरवर्षी या वाहनचालकांच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी ओढवते.
सन २0१0 मधील कंत्राटदार संतोष बेनीराम रहांगडाले, सन २0११ मधील कंत्राटदार विनोद सुधाकर लांडगे यांनी अजूनही वाहनचालकांना काही महिन्यांचे मानधन व सेक्युरिटीचे पैसे अजुनही दिले नाही.
अनेकदा जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यात आली. परंतु काहीही कारवाई करण्यात आलेली नाही. दोन्ही कंत्राटदारांवर त्वरित कारवाई करून मानधन व सेक्युरिटीची रक्कम परत देण्यात यावे, अशी मागणी सर्व वाहनचालकांनी केली आहे.
सन २0१३ पासून वाहनचालकांची नियुक्ती रूग्ण कल्याण समिती किंवा जिल्हा परिषदेमार्फत करण्यात येते. मानधन प्रत्येक महिन्याला देण्यात यावे. कंत्राटदाराला वाहनचालकांची पदे भरण्याचे कंत्राट देण्यात येवू नये. सदर वाहनचालकांनी ११ वर्षे सुरळीत सेवा दिलेली आहे.
त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी येऊ देऊ नये व आरोग्य विभागातील वाहनचालकांना कंत्राटदारांमार्फत नियुक्ती देण्यात येऊ नये, अशी मागणी चंद्रशेखर पटले, महेंद्र बुरले, शेखर चंद्रिकापुरे, भूषण उईके, एन.बी. पडोले, पवनकुमार काळसर्पे, एन.बी. आगाशे, टिकाराम नाकाडे, विजय भेलावे, नारायण बावनथडे, चंद्रकांत टेंभुर्णे आदी वाहनचालकांनी केली आहे.