प्रवाशांनी प्राणभयाने मारल्या बसबाहेर उड्या…

0
10

भोपाळ(वृत्तसंस्था) – जबलपूर येथील विमानतळावर बसने प्रवास करत असलेल्या 30 प्रवाशांनी एअर इंडिया कंपनीचे विमान बसच्या अचानक खूप जवळ आल्याने प्राणभयाने बसबाहेर उड्या मारल्याचे वृत्त सूत्रांनी दिले. सुदैवाने या विमानाचा पंख बसला न धडकल्याने मोठी दुर्घटना टळली. या पार्श्‍वभूमीवर, एअर इंडियास हवाई प्रवास नियमन संस्थेकडून इशारा देण्यात आला आहे.

हे विमान प्रशिक्षित कर्मचाऱ्याच्या मदतीने “पार्क‘ न करता एका मदतनीसाकरवी पार्क करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचेही या पार्श्‍वभूमीवर निष्पन्न झाले आहे. जबलपूरच्या दुमना विमानतळावर अलायन्स एअर (एअर इंडिया) कंपनीचे विमान नियोजित वेळेआधीच 15 मिनिटे उतरल्यानंतर विमानतळावरील “पार्किंग बे‘च्या दिशेने येत होते. याचवेळी, स्पाईसजेट कंपनीच्या विमानामधून उतरलेले प्रवासी बसमधून टर्मिनलकडे येत होते. या बसच्या दिशेने विमान धोकादायक पद्धतीने येत असल्याचे पाहून बसमधील कर्मचाऱ्यांनी आरडाओरडा विमानाच्या कप्तानाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. बसमधील प्रवाशांनी या प्रकारानंतर बसबाहेर उड्या मारल्याचे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, या प्रकरणी स्पाईस जेटकडून औपचारिक तक्रार नोंदविण्यात आली आहे. दरम्यान, विमान व बसमध्ये सुरक्षित अंतर असल्याचा दावा एअर इंडियाकडून करण्यात आला आहे.