देशाच्या विकासासाठी आरक्षणाची आवश्यकता – हार्दिक पटेल

0
13

नवी दिल्ली वृत्तसंस्था दि. 6– २०१७ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपला संपवणार असल्याचे पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेलने अहमदाबाद मिरर या वृत्तपत्राला सांगितले असून गुजरातमधून भाजपला संपवणार ही गोष्टी स्पष्ट आहे. भाजपला सत्तेवर आमच्या समाजातील पटेलांनीच आणले होते. आता तेच त्यांना धूळ चारतील. मी गुजरातला शेतकऱ्याचा मुलगा या नात्याने हे वचन दिले आहे, असे हार्दिकने म्हटले आहे. या वेळी त्याने आप आणि काँग्रेसबरोबर जाण्याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्न टाळण्याचा प्रयत्न केला. मी आरक्षण मागत आहे, भीक मागत नाही. मी फक्त सरकारी नोकरी आणि दाखल्यांवर पाटीदार समाजाला समान संधी मिळण्याची मागणी करत आहे. मी एससी, एसटी आणि ओबीसीच्या आरक्षणाविरोधात नाही. मला देशाच्या विकासासाठी आरक्षणाची आवश्यकता वाटते, असे तो म्हणाला.
हार्दिकने गुजरातमध्ये काही दिवसांपूर्वी आरक्षणासाठी मोठे आंदोलन केले होते. मोदी सरकार माझ्या आंदोलनाला घाबरले आहे. परंतु मोदी आणि अमित शहा यांच्याप्रमाणे मला काही लपवण्याची व कोणाला घाबरण्याची गरज नाही, असे तो म्हणाला. एखाद्यावर तुम्ही राजद्रोहाचा आरोप लावण्यासारखे दुसरे वाईट कार्य करू शकत नाही. माझ्यावर सरकारने राजद्रोहाचा आरोप लावला. त्यानंतर ९ महिने मला तुरूंगात ठेवले. परंतु यामुळे खचलो नाही तर आणखी मजबूत झालो आहे. मला देशातील लोकांचा पाठिंबा मिळत आहे. माझ्या वयाचे युवक माझ्याबरोबर आहेत. यापेक्षा सरकार माझ्याबरोबर आणखी वेगळे काय करू शकते, असा सवाल केला.
तो भाजपवर निशाणा साधताना म्हणाला, जनतेचे प्रतिनिधीत्व करत असल्याचा कितीही दावा भाजप करत असले तरी यात काहीच तथ्य नाही. भाजपच्या विजयासाठी माझ्या कुटुंबीयाने मोठी मेहनत घेतली होती. परंतु त्या लोकांना भाजप विसरली आहे.