वैद्यकीय शिक्षण प्रवेशात ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना २७ टक्के आरक्षण मिळावे-खा.पटोले

0
14

नवी दिल्ली,दि.02: वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशात इतर मागास प्रवर्गातील (ओबीसी) विद्यार्थ्यांना २७ टक्के आरक्षणानुसार प्रवेश देण्यात यावा,अशी मागणी भंडारा व गोंदिया लोकसभा मतदार संघाचे खासदार नाना पटोले यांनी संसदेत केली.
लोकसभेत आज शुन्यकाळात श्री पटोले यांनी वैद्यकीय शिक्षणात ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा मुद्दा उपस्थित केला.श्री. पटोले म्हणाले, यावर्षी पासून वैद्यकीय प्रवेशासाठी राष्ट्रीय पातळीवर नीट ही परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले आहे. सर्वोच्च न्यायालयाने ०४ जुलै २००७ रोजी दिलेल्या निर्णयाप्रमाणे शिक्षण प्रवेशात ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना २७ टक्के आरक्षणाचा नियम लागु आहे. वैद्यकीय प्रवेशातही हेच निकष लावण्यात आले पाहीजे. तथापि, राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेच्यावतीने या निर्णयाची अंमलबजावणी न करता ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रवेशात आरक्षणापासून वंचित ठेवण्यात आले आहे.
शैक्षणिक प्रवेशात इतर मागास प्रवर्गासाठी २७ टक्के आरक्षण, अनुसूचित जाती प्रवर्गासाठी १५ टक्के तर अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी ७.५ टक्के जागांचे आरक्षण देण्याचा नियम असताना देखील वैद्यकीय प्रवेशाबाबत ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आरक्षणापासून वंचित ठेवले जात आहे.ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांवर अन्याय होत असून विद्यार्थ्यांवरील अन्याय दूर करून त्यांना वैद्यकीय शिक्षण प्रवेशात २७ टक्के आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी श्री.पटोले यांनी संसदेत केली.