राज्याला राष्ट्रीय ‘ई-पंचायत’ आणि ‘राज्य हस्तातंरण निर्देशांक’ पुरस्कार

0
18

नवी दिल्ली : पंचायतराज व्यवस्था हा देशाचा कणा आहे, त्याला अधिक मजबूत करण्याकरिता पंचायतराज विविध उपक्रम राबविते. याचाच एक भाग म्हणून राष्ट्रीय पंचायत राज दिनानिमित्त पंचायतराज व्यवस्थेमध्ये उत्कृष्ट कार्याबद्दल राज्याला ‘ई-पंचायतीचा’ आणि ‘राज्य हस्तांतरण निर्देशांक’(state Devolution index) या राष्ट्रीय पुरस्काराने पंतप्रधानाच्याहस्ते सन्मानित करण्यात आले. याशिवाय राज्यातील एकूण 20 जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींनाही सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाकरिता राज्यातून 92 प्रतिनिधी सहभागी झाले होते.

येथील विज्ञान भवनात शुक्रवारी 22 व्या ‘राष्ट्रीय पंचायतराज दिन’ कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय ग्रामविकास व पंचायतराज मंत्री बिरेंद्र सिंग, केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री निहाल चंद मेघवाल, सचिव एस.एम. विजयांनद, राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री दिपक केसरकर, ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव वी. गिरीराज तसेच विविध राज्यातील ग्रामविकास मंत्री, जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. पंतप्रधानाच्या हस्ते ‘डीव्हयॉल्युशन इन्डेक्स 2014-15’ या पुस्तकाचे विमोचन याप्रसंगी करण्यात आले.

राज्याला ई-पंचायतमध्ये उत्कृष्ट कार्याबद्दल सलग तिसऱ्‍यांदा आणि ‘राज्य हस्तातंरण निर्देशांक’ (State Devolution Index), मध्ये चौथा क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आले. हा पुरस्कार राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री दिपक केसरकर आणि प्रधान सचिव वी. गिरीराज यांनी पंतप्रधानाच्याहस्ते स्वीकारला.

पंतप्रधान यांनी कार्यक्रमात संबोधित करताना गावातील एकही व्यक्ती गरिब, अशिक्षित राहणार नाही याकडे लक्ष केंद्रीत करून, त्यासाठी वेगवेगळे बिनखर्ची उपाय सुचवून गावे सूजलाम सूफलाम करण्याचा मंत्र देत केवळ निधीचीच नाही तर इच्छाशक्तीची सर्वाधिक गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी केंद्रीय ग्रामविकास व पंचायतराज मंत्री बिरेंद्र सिंग, केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री निहाल चंद मेघवाल यांनीही पंचायतराज व्यवस्थेला अधिक सदृढ करण्याबाबत विचार व्यक्त केले. या पहिल्या सत्राचे आभार केंद्रीय ग्रामपंचायत सचिव एस.एम.विजयानंद यांनी मानले.

श्री.केसरकर यांनी मनोगत व्यक्त करताना राज्यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतींमार्फत केलेल्या विकास कार्याची माहिती दिली. तसेच त्यांनी पंचायत समिती, ग्रामपंचायतांनी आपल्या योजना स्थानिक गरजेनुसार तयार कराव्यात असा मोलाचा सल्लाही त्यांनी दिला.

24 एप्रिल हा दिन दरवर्षी ‘राष्ट्रीय पंचायतराज दिन’ म्हणून भारत सरकार साजरा करते. या दिनानिमित्तच्या कार्यक्रमात प्रथम सत्रात पंतप्रधानाच्या हस्ते पुरस्कार वितरण तसेच पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्री यांचे भाषणे झाली. दुसऱ्‍या सत्रात विविध राज्यातील ग्रामविकास मंत्र्यांनी पंचायतराजमध्ये केलेल्या कामाच्या माहितीचे देवाणघेवाण केली. तिसऱ्‍या सत्रात पंचायतराजमध्ये मनरेगा, स्वच्छता मिशनची भूमिका किती व कशी महत्त्वपूर्ण असायला हवी याबाबत संबधित अधिकारी, सभापती, सरपंच व सदस्य यांच्या चर्चेचे आयोजन करण्यात आले. चौथ्या सत्रात केंद्रीय ग्रामविकास तथा पंचायतराज्य मंत्री यांच्या हस्ते जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत यांना सन्मानित करण्यात आले.

केंद्रीय ग्रामविकास तथा पंचायतराज मंत्री बिरेंद्र सिंग यांच्या हस्ते राज्यातील एकूण 20 जिल्हापरिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतींना पुरस्कृत करण्यात आले. यामध्ये राष्ट्रीय गौरव ग्रामसभा पुरस्कार पुणे जिल्ह्यातील कान्हेवाडी (ता. खेड) ग्रामपंचायतचे सरपंच नवनाथ पवार यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. पंचायतराज संस्थामध्ये कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष विमल पाटील, माजी मुख्य कार्यकारी अधिकारी विजय सूर्यवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार यांनी पुरस्कार स्वीकारला. लातूर जिल्ह्यातील रेणापूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी वैजनाथ लोखंडे, श्याम पटवारी, माजी अध्यक्षा अनिता पवार, हिंगोली पंचायत समितीच्या सभापती सीताबाई राठोड यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

नाशिक जिल्ह्यातील कळवण पंचायत समितीच्या सभापती संगीता ठाकरे, गट विकास अधिकारी मधुकर शिरसाठ यांनी पुरस्कार स्वीकारला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोभुर्लबाजार ग्रामपंचायत (ता.वेंगुर्ला) सरपंच प्रदीप प्रभू, ग्रामसेवक मंगेश नाईक यांनी पुरस्कार स्वीकारला. रायगड जिल्ह्यातील चंदोरे (ता. माणगांव) ग्रामपंचायतचे सरपंच विष्णू भोसले, ग्रामसेवक विनोद मोरे यांनी पुरस्कार स्वीकारला. अहमदनगर जिल्ह्यातील लोणी (ता.राहाता) ग्रामपंचायतचे सरपंच राजेश्री विखे, ग्रामसेवक श्रीमती कविता आहेर यांनी पुरस्कार स्वीकारला. नाशिक जिल्ह्यातील दरी ग्रामपंचायतच्या सरपंच गजराबाई लहांगे, ग्रामसेवक दौलत गांर्गुडे यांनी पुरस्कार स्वीकारला. भंडारा जिल्ह्यातील माळेगांव (ता. कामाठी) ग्रामपंचायतचे सरपंच शेषराव वानखेडे, ग्रामसेवक प्रवीण गावंडे यांनी पुरस्कार स्वीकारला. भंडारा जिल्ह्यातील शिवनी-मोगरा (ता. लखानी) ग्रामपंचायतचे सरपंच पद्माकर भावणकर, ग्रामसेवक जयंत गडपायले यांनी पुरस्कार स्वीकारला. सातारा जिल्ह्यातील मान्याचीवाडी (ता. पाटण) ग्रामपंचायतचे सरपंच रविंद्र माने, ग्रामसेवक प्रसाद यादव यांनी पुरस्कार स्वीकारला.

सांगली जिल्ह्यातील कोकरुड (ता. शिराळा) ग्रामपंचायतच्या सरपंच वृशाली पाटील, गट विकास अधिकारी दिपाली पाटील यांनी पुरस्कार स्वीकारला. अमरावती जिल्ह्यातील चेनुष्टा (ता.तिवसा) ग्रामपंचायतचे सरपंच पंकज आमले, ग्रामसेवक निलेश भुसारी यांनी पुरस्कार स्वीकारला. अकोला जिल्ह्यातील धाबा (ता. बार्शीटाकळी) ग्रामपंचायतीच्या सरपंच नीता डाबेकर, ग्रामसेवक विनोद सोनावणे यांनी पुरस्कार स्वीकारला. नांदेड जिल्ह्यातील झरी (ता. लोहा) ग्रामपंचायतचे सरपंच शिवाजी चालगुरगी, ग्रामसेवक अभिजीत भोसले यांनी पुरस्कार स्वीकारला. औरंगाबाद जिल्ह्यातील कुंभेफळ ग्रामपंचायतच्या सरपंच कांताबाई मुळे, ग्रामसेवक श्रीमती संगिता तायडे यांनी पुरस्कार स्वीकारला. नाशिक जिल्ह्यातील नागलवाडी ग्रामपंचायतचे सरपंच लक्ष्मण पोटींडे, ग्रामसेवक बबन गोरे यांनी पुरस्कार स्वीकारला. पालघर जिल्ह्यातील मनोर ग्रामपंचायतचे सरपंच संतोष माळी, ग्रामसेवक रमाकांत शिंदे यांनी पुरस्कार स्वीकारला. उस्मानाबाद जिल्ह्यातील तालमोड (ता. उमरगा) ग्रामपंचायतच्या सरपंच रेखा मोरे, ग्रामसेवक शेषराव कांबळे यांनी पुरस्कार स्वीकारला. चंद्रपूर जिल्ह्यातील निलज (ता. बाम्हपुरी) ग्रामपंचायतच्या सरपंच सुशिला ऊसाके, ग्रामसेवक चंद्रगुप्त चहांदे यांनी पुरस्कार स्वीकारला.