कोपेला येथे मतदान पथकावर नक्षल्यांचा गोळीबार

0
21

गडचिरोली-: ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नक्षल्यांनी आज सिरोंचा तालुक्यातील कोपेला येथील मतदानपेटया घेऊन परतणाऱ्या कर्मचाऱ्यांवर गोळीबार केला. मात्र कर्मचाऱ्यांच्या संरक्षणार्थ तैनात असलेल्या पोलिसांनी नक्षल्यांचा हल्ला परतावून लावला. दरम्यान कोपेला येथील घटना वगळता सर्वत्र शांततेत मतदान झाले असून, पहिल्या टप्प्यात सरासरी ६७ टक्के मतदान झाल्याचा दावा पोलिस विभागाने केला आहे.
आज अहेरी उपविभागातील अहेरी, एटापल्ली, सिरोंचा व भामरागड या चार तालुक्यांमधील ग्रामपंचायतींची सार्वत्रिक व पोटनिवडणूक होती. चारही तालुके नक्षलग्रस्त असल्याने व निवडणुकीच्या वेळी नक्षल कारवायांचा पूर्वानुभव असल्याने निवडणूकस्थळी प्रचंड पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आज दुपारी ३ वाजतानंतर कोपेला येथील मतदान पथकातील कर्मचारी मतपेटया घेऊन झिंगानूरकडे जाण्यास निघाले असता नक्षल्यांनी कर्मचाऱ्यांच्या दिशेने गोळीबार केला. मात्र पोलिसांनी गोळीबारानेच प्रत्युत्तर दिल्याने नक्षली जंगलात पळून गेले. या चकमकीत कुणीही जखमी झाले नाही.
दरम्यान पहिल्या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत सरासरी ६७ टक्के मतदान झाल्याचा दावा पोलिस विभागाने केला आहे. अहेरी विभागात ७३ टक्के, सिरोंचात ७२ टक्के, जिमलगट्टयात ६३ टक्के, तर एटापल्ली विभागात ५५ टक्के मतदान झाल्याची माहिती पोलिस अधीक्षक कार्यालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.