समस्या निवारणात सरकार अपयशी- माजी आमदार संजय पुराम

0
134

देवरी=राज्यातील महाविकास आघाडी सरकार सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडविण्यात सर्वच बाबतीत अपयशी ठरले असल्याचा आरोप करीत आज मंगळवार, १0 नोव्हेंबर रोजी देवरी तहसील कार्यालयावर माजी आमदार संजय पुराम यांच्या नेतृत्वात मोर्चा काढून विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना पाठविण्यात आले.
राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तारुढ झाल्यापासून राज्यातील सर्वसामान्य जनता, शेतकरी व्यापारी, घरकूल लाभार्थी यांच्या समस्येत भर पडली आहे. शासन त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत आहे. दिवाळीसारखा महत्त्वाचा सण काही दिवसांवर असून शेतकर्‍यांच्या समस्यांचे निराकरण झाले नाही. कुंभकर्णी झोपेत असलेल्या महाविकास आघाडी शासनाला जागविण्यासाठी माजी आमदार संजय पुराम यांच्या नेतृत्वात, विधान परिषद सदस्य डॉ. परिणय फुके, भाजपाचे देवरी तालुका अध्यक्ष अनिल येरणे यांच्या उपस्थितीत देवरी तहसील कार्यालयावर धडक देण्यात आली. यावेळी सरकार विरोधात तीव्र घोषणा देत विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री यांना तहसीलदार यांच्यामार्फत पाठविण्यात आले. निवेदनात तत्काळ शासकीय धान्य खरेदी सुरू करावी, शेतकर्‍यांचे मागील खरीप हंगामातील बारदाण्याचे पैसे तात्काळ द्यावे, तालुक्यात शेतकर्‍यांचे धान पुंजणे जळून नुकसान करणार्‍या आरोपींचा शोध घेऊन कठोर शिक्षा करणे व नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना तत्काळ आर्थिक मदत देणे मावा, तुडतुडा व अतवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आर्थिक मदत देणे, घरकूल लाभार्थ्यांना तत्काळ अनुदान व मालकी पट्टे देणे आदींसह इतर १७ मागण्यांचा समावेश आहे. निवेदन देतेवेळी प्रमोद संगडीवार, श्रीकृष्ण हुकरे, यादोराव पंचमवार, डॉ. रहांगडाले यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.