दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी राष्ट्रवादीचे जेलभरो आंदोलन होणार-खा.पटेल

0
5

मुंबई,दि.3-महाराष्ट्रातल्या भीषण दुष्काळी परिस्थितीसंबंधी आढावा घेण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पार पडली.
या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल पटेल, मधुकर पिचड, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, सचिन अहिर, अनिल देशमुख यांसह अनेक मान्यवर नेते उपस्थित होते.या बैठकीत झालेल्या ठरावांसंबधीची माहिती ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल पटेल देतांना म्हणाले की,”मराठवाड्यासहित विदर्भातही दुष्काळी परिस्थिती गंभीर आहे. या परिस्थितीत लोकांना मदत करण्यासाठी, त्यांच्यासाठी आवाज उचलण्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत. मराठवाड्यात १४ सप्टेंबर रोजी जेल भरो आणि १५ तारखेला नाशिक आणि नगर जिल्ह्यात जेल भरो करणार आहोत. जिल्ह्यातील प्रमुख नेते या आंदोलनात सहभागी होणार आहेत.”
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले की, आमच्या वतीने एक महिना आधीच सरकारकडे मागण्या केल्या गेल्या होत्या. परंतु, या सरकारने आमच्या मागण्यांकडे अक्षम्य दुर्लक्ष केले. म्हणूनच येत्या १४ तारखेला मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये जेल भरो आंदोलन सुरू होणार आहे.याच बैठकीत हवामान खात्याच्या अंदाजावरही चर्चा झाली. परतीचा पाऊस नीट पडला नाही तर परिस्थिती आणखी गंभीर होईल, याची जाणीव ठेवून सरकारने आतापासूनच उपाययोजना करायला हव्यात, याचे भानही सरकारला विरोधी पक्षांनीच करून देण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या दुष्काळी दौऱ्यात मुख्यमंत्र्यांची पाठ फिरताच चारा छावण्या आणि स्टॉल काही तासांतच काढण्यात आले, ही वस्तुस्थिती अत्यंत खेदाची आहे. ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा आहे. या सरकारकडून दुर्दैवाने काहीच उपाययोजना होत नसल्यामुळे आंदोलन छेडण्याचा निर्णय आम्हाला घ्यावा लागत असल्याचे म्हणाले.