देशभरात शिवसेना निवडणुका लढवणार:उद्धव ठाकरे

0
7

कल्याण – बिहार विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेला दोन लाख मते मिळाली आहेत. बिहारसारख्या अमराठी राज्यात शिवसेनेला मिळालेली मते ही लक्षणीय आहेत. त्यामुळे सर्वच राज्यांत शिवसेना निवडणुकीच्या रिंगणात ताकदीनिशी उतरेल, असे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी सांगितले. कल्याण-डोंबिवली पालिकेच्या महापौरपदी शिवसेनेचे राजेंद्र देवळेकर बिनविरोध निवडून आल्याने त्यांचे अभिनंदन करण्यासाठी स्वतः ठाकरे पालिकेत आले होते. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी रश्‍मी ठाकरे, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेनेचे खासदार अनिल देसाई, श्रीकांत शिंदे, पालकमंत्री एकनाथ शिंदे, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, आमदार सुभाष भोईर आदी होते. 

राज्यात व राज्याबाहेर शिवसेनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. शिवसेना सामान्यांच्या प्रश्‍नासाठी झटते. त्यामुळे जनाधार शिवसेनेच्या पाठिशी राहतो. बिहारमध्ये दोन लाख मते शिवसेनेला मिळतात, ही बाब हुरूप वाढवणारी आहे. त्याच आधारे शिवसेना विविध राज्यांत आपले पाय रोवण्यास सुरुवात करणार आहे. लोकसभेला व राज्यात विधानसभेला शिवसेना भाजपचे काय झाले यावर त्यांनी भाष्य करणे टाळले.