खासगी क्षेत्रातही आरक्षण हवे – मायावती

0
12

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासगी क्षेत्रामध्ये जातिआधारित आरक्षण द्यावे, अशी मागणी बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी केली आहे.  उच्चवर्णीयांमधील गरीब घटकालाही आरक्षणाची गरज आहे, असे प्रतिपादन  त्यांनी यावेळी  केले. पंतप्रधानांच्या राज्य सभेमधील भाषणासंदर्भात मायवती यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. 

“दलित समुदायास मिळणाऱ्या आरक्षणाच्या मर्यादेत वाढ होणे आवश्‍यक असून इतर समुदायांचाही आरक्षणाच्या धोरणामध्ये अंतर्भाव करणे गरजेचे आहे. याशिवाय धर्मांतर केलेल्या दलितांनाही आरक्षणामध्ये वाटा दिला जावा. आपल्या नशीबामध्ये बदल करण्यासाठी बहुजन वर्गाने सत्ता मिळवावयास हवी. सत्ता हीच या समस्येची गुरुकिल्ली आहे,‘‘ असे मायावती म्हणाल्या. 

ताज कॉरिडॉर प्रकरणी भाजप व कॉंग्रेस या पक्षांकडून आपल्याला गोवले जात असल्याचा दावा करत मायावती यांनी यावेळी उत्तर प्रदेशच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून सीबीआयचा गैरवापर केला जात असल्याचा आरोपही केला.