वंचितच्या पक्षवाढीसाठी सामुहिक प्रयत्न करा:- प्रमोद नेवारे

0
10

अर्जुनी मोर. :– सध्या अर्जुनी मोर तालुक्यात वंचित बहुजन आघाडीने पंचायत समितीसह नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायती निवडणुकांमधे घवघवीत यश प्राप्त केले आहे. पंचायत समिती सभापती, सरपंच व उपसरपंच तथा अनेक गावांत सदस्य सुध्दा निवडुन आले आहेत.तालुक्यात वंचीतचे पाच सरपंच, दोन उपसरपंच व 23 ग्रामपंचायत सदस्य निवडुन आले. त्यामुळे वंचीत बहुजन आघाडीचा विस्तार करण्यासाठी व पक्षबांधणीसाठी आता गावागावात शाखा निर्माण करण्यासाठी सामुहिक प्रयत्न करण्याची गरज आहे असे आवाहन वंचीत बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष प्रमोद नेवारे यांनी केले आहे.
तालुक्यातील कालीमाटी ( प्रतापगड )( येथे ता.12 )येथे आयोजित वंचीत बहुजन आघाडीचे नवनिर्वाचित पदाधिकारी यांच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी विशेष अतिथी म्हणुन ते बोलत होते. सत्कार सोहळ्याचे अध्यक्षस्थानी अशोकभाऊ खोब्रागडे होते.यावेळी रजनी शहारे,शकुंतला वालदे,सभापती सविता कोडापे, डाॅ.कबीरदास मेश्राम, विश्वनाथ खोब्रागडे, दिलीप मेश्राम, हितेश शहारे, शिगु कोवे,प्रकाश कानेकर, सिध्दार्थ उंदिरवाडे, प्रकाश रामटेके, गुणवंत जनबंधु,उमेश डोंगरवार, राकेश नेवारे,अनंतकुमार नेवारे,हेमंत कुळमते,गौतम रामटेके, प्रमोद नेवारे, व अन्य वंचीत चे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. सर्वप्रथम डाॅ. बाबासाहेब आंबेडकर व भगवान बुद्ध यांचे प्रतिमेला माल्यार्पण व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. यावेळी नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा अर्जुनी मोर. पंचायत समिती सभापती सविता कोडापे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. यामधे मोरगाव च्या सरपंच गिताबाई नेवारे,सोमलपुर च्या सरपंच भुमिका ढोक,सिरोली चे सरपंच नाजुक लसुंते, सह पाच सरपंच दोन उपसरपंच तथा 23 ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.