भाजप-शिवसेनेतर्फे 30 मार्च पासून स्वातंत्र्यवीर सावरकर गौरवयात्रा

0
12

**- आ. विजय रहांगडाले यांची पत्रपरिषदेत माहिती*

गोंदिया : स्वातंत्रवीर सावरकर यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील कामगिरीचे स्मरण करुन देण्यासाठी राज्यभरात 30 मार्च ते 6 एप्रिल दरम्यान भाजपा व शिवसेनेतर्फे स्वातंत्रवीर गौरव यात्रा काढण्यात येणार आहे. जिल्ह्यात चारही विधानसभा क्षेत्रात ही गौरव यात्रा काढण्यात येणार असून नव्या पीढीला स्वातंत्रवीर सावरकरांच्या कार्याची ओळख करुन देण्यात येणार असल्याची माहिती या यात्रेचे पूर्व विदर्भ प्रमुख आमदार विजय रहांगडाले यांनी दिली.
स्थानिक शासकीय विश्रामगृहात आज, 31 मार्च रोजी आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. पत्रपरिषदेला भाजपा जिल्हाध्यक्ष केशवराव मानकर, माजी आ. गोपालदास अग्रवाल, माजी आ. रमेश कुथे, भंडारा-गोंदिया जिल्हा संपर्क प्रमुख विरेंद्र अंजनकर, माजी नगराध्यक्ष अशोक इंगळे, जिल्हा महामंत्री संजय कुळकर्णी आदी उपस्थित होते. आ. रहांगडाले पुढे म्हणाले, राहूल गांधी व काँग्रेसच्या अन्य नेत्यांकडून सावरकरांचा वारंवार अपमान केला जात आहे. सावरकरांचा अपमान करणार्‍या काँग्रेससोबतची युती उद्धव ठाकरे यांनी तोडून दाखवावीच, असे आव्हानही आ. रहांगडाले यांनी यावेळी दिले. राज्यातील सर्व 288 विधानसभा मतदारसंघातून सावरकर गौरव यात्रा प्रवास करेल. 6 एप्रिल रोजी भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनी या यात्रेचा समारोप होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुठे तसेच भाजप व शिवसेनेचे सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी या यात्रेत सहभागी होणार आहे. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसकडून स्वातंत्रवीर सावरकरांचा वारंवार होणारा अपमान सत्ता ठिकवण्यासाठी निमुटपणे सहन केला. सत्तेसाठी उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाचा विचार सोडून दिला. बाळासाहेब ठाकरे यांनी सावरकरांचा अपमान करणार्‍या मणीशंकर अय्यर यांच्या प्रतिमेला स्वतः रस्त्यावर उतरुन जोडे मारले होते. तशी हिंमत उद्धव ठाकरेंनी दाखवायला हवी होती, असेही आ. रहांगडाले यांनी यावेळी नमूद केले. या यात्रेसाठी प्रदेश संयोजक म्हणून प्रदेश महामंत्री विक्रांत पाटील, मुंबई सरचिटणीस संजय उपाध्याय यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात्रेचे मुंबई विभाग प्रमुख आ. अमित साटम, ठाणे कोकण प्रमुख आ. निरंजन डावखरे, आ. नितेश राणे, पश्चिम महाराष्ट्र विभाग प्रमुख प्रदेश महामंत्री मुरलीधर मोहोळ, विक्रम पावसकर, उत्तर महाराष्ट्र विभाग प्रमुख आ. जयकुमार रावल, प्रदेश महामंत्री विजय चौधरी, मराठवाडा विभाग प्रमुख आ. संभाजी निलंगेकर, प्रदेश महामंत्री संजय केणेकर, पूर्व विदर्भ विभाग प्रमुख आ. प्रवीण दटके, आ. विजय रहांगडाले, पश्चिम विदर्भ विभाग प्रमुख आ. संजय कुटे, प्रदेश महामंत्री आ. रणधीर सावरकर असल्याचे आ. रहांगडाले यांनी सांगितले.