संघाच्या जवळिकेमुळे अर्थतज्ज्ञ नरेंद्र जाधव राज्यसभेवर

0
9
मुंबई- राज्यसभेत राष्ट्रपती निर्देशित पाठविल्या जाणा-या सदस्यांसाठी मोदी सरकारने 7 जणांची नावे निश्चित केल्याचे पुढे आले आहे. भाजपचे सुब्रमण्यम स्वामी, माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू, ऑलिम्पिक विजेती बॉक्सर मेरी कोम, महाराष्ट्रातील अर्थतज्ज्ञ नरेंद्र जाधव, मल्याळम अभिनेता सुरेश गोपी, पत्रकार स्वपन दासगुप्ता आणि अनुपम खेर किंवा रजत शर्मा यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याचे कळते आहे.अर्थतज्ज्ञ व पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरु राहिलेले नरेंद्र जाधव यांना राज्यसभेवर घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट होत आहे. नरेंद्र जाधव यांनी यापूर्वी नियोजन आयोगात मोलाची कामगिरी केली आहे. तसेच देशाची आर्थिक निती व धोरणे काय असावीत यासाठी योगदान दिले आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी जाधवांकडे मोठी जबाबदारी दिली होती. त्यामुळे ते काँग्रेसमध्ये जाणार अशा वावड्या उठल्या होत्या. एवढेच नव्हे तर लातूर किंवा शिर्डी या राखीव लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस तिकीटावर लढणार असल्याचे सांगितले गेले. मात्र, पुढे काहीच झाले नाही.
दरम्यान, भाजप सत्तेत आल्यानंतर नरेंद्र जाधव यांनी पंतप्रधान मोदींबाबत सकारात्मक भाष्य केले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूरातील एका कार्यक्रमातही जाधवांनी हजेरी लावली होती. त्यावेळी याची मोठी चर्चा झाली. त्याचवेळी नरेंद्र जाधवांची संघाशी जवळिक वाढत असल्याचे बोलले गेले. काँग्रेसचे नेते व अर्थतज्ज्ञ भालचंद्र मुणगेकर राज्यसभेतून निवृत्त होताच त्याच जागेवर भाजपने महाराष्ट्रातूनच मराठी व दलित असलेल्या अर्थतज्ज्ञ नरेंद्र जाधवांना तेथे पाठविण्याचा धोरणात्मक निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे.