नागपूर : महाविकास आघाडीच्या जागावाटपात सांगलीची जागा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे गेली आहे. मात्र, या जागेसाठी काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी आणि आमदार आग्रही असल्याने काँग्रेस पक्षश्रेष्ठींपुढे पेच निर्माण झाला आहे. आमदार विश्वजीत कदम यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली आणि या जागेवर विशाल पाटील यांना संधी मिळावी यासाठी आग्रह धरला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांसोबत असल्याचे सांगून या जागेबाबत शिवसेनेने त्यांची तेथील शक्ती पाहून पुर्नविचार केल्यास काँग्रेस तयार असल्याचे सांगतिले. ते नागपुरात एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.
ते म्हणाले, सांगलीमध्ये शिवसेनेच्या उमेदवाराची तयारी नाही. ही बाब शिवसेनेच्या नेत्यांच्या लक्षात यायला हवी. या जाणिवेतून समजा शिवसेनेने उमेदवार मागे घेतल्यास काँग्रेसचा एबी फॉर्म तयार आहे. पण जर शिवसेनेला ती जागा लढवायची असेलतर आघाडीचा धर्म म्हणून काँग्रेस त्यांच्याबाजूने मजबुतीने उभे राहील. स्थानिक पदाधिकाऱ्यांना देखील उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सांगण्यात येईल, असेही पटोले म्हणाले. आमदार विश्वजीत कदम, विशाल सावंत आणि पृथ्वीराज पाटील तिघांना महाविकास आघाडी सोबत राहण्याची सूचना काल करण्यात आली. सांगलीची जागा शिवसेनेला गेल्यामुळे केवळ कार्यकर्त्यांचाच नाही तर प्रदेशाध्यक्ष म्हणून माझाही हिरमोड झाला, अशी खंतही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केली.