७ हेलिकॉप्टर, १५ हजारांहून अधिक जवान, गडचिरोलीत

0
143

गडचिरोली : युद्ध क्षेत्राचा भास व्हावा अशी स्थिती सद्या गडचिरोलीच्या अतिसंवेदनशील भागात दिसून येत आहे. नक्षल्यांच्या सावटाखाली पार पडत असलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासनाने विशेष तयारी केली असून अतिसंवेदनशील भागात मतदान यंत्र आणि कर्मचारी नेण्यासाठी वायुसेनेच्या ७ हेलिकॉप्टरची मदत घेतली जात आहे. नक्षल कारवायांवर अंकुश ठेवण्यासाठी विविध दलातील तब्बल १५ हजारांहून अधिक पोलीस जवान तैनात करण्यात आले आहेत.

नक्षलवाद्यांच्या दहशतीमुळे निवडणूक प्रक्रिया राबविण्याच्या दृष्टीने राज्यात सर्वाधिक धोकादायक जिल्हा म्हणून गडचिरोलीची ओळख आहे. त्यामुळे निवडणुकीदरम्यान प्रशासनाला इतर जिल्ह्याच्या तुलनेत विशेष तयारी करावी लागते. १९ एप्रिल रोजी जिल्ह्यात लोकसभेकरिता मतदान होणार आहे. त्यासाठी पोलीस प्रशासनाने सहा महिन्यांपासून तयारी चालवली होती.

निवडणुकांचा पूर्वानुभव लक्षात घेता पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून अतिसंवेदनशील आणि दुर्गम भागात हेलिकॉप्टरच्या साहाय्याने १६ एप्रिलपासूनच मतदान यंत्र आणि कर्मचारी पोहचवण्यात येत आहेत. त्यासाठी स्थानिक सी ६० जवानांच्या दिमतीला विविध दलातील १५ हजारहून अधिक पोलीस वायुसेनेचे ७ हेलिकॉप्टर देण्यात आले आहेत. आज, मंगळवारी अतिसंवेदनशील ६८ मतदान केंद्रांवरील ७२ पथकाच्या २९५ मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदान यंत्रासह बेसकॅम्पवर सुरक्षितपणे पोहोचवण्यात आले. पुढचे दोन आणि निवडणुकीनंतर दोन दिवस सुरक्षितपणे मतदान पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणा सतर्क झाली असून जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले.