विदर्भवाद्यांनी नागपूर कराराची होळी केली

0
6
नागपूर,ता. २८ –  नागपूर कराराप्रमाणे  ६३ वर्षानंतरही विदर्भाला अद्यापही न्याय न मिळाल्याच्या निषेधार्थ विदर्भ राज्य आघाडीतर्फे (विरा) बुधवारी नागपूर कराराची होळी करण्यात आली. विदर्भाच्या विकासाकडे दुर्लक्ष करून सापत्न वागणूक दिल्याने आता वेगळे राज्य घेऊनच राहू, असा संकल्प यावेळी विदर्भवाद्यांनी केला. यावेळी विविध विदर्भवादी संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.
राज्याचे माजी महाधिवक्ता व ज्येष्ठ विदर्भवादी नेते अ‍ॅड. श्रीहरी अणे हे संस्थापकीय अध्यक्ष असलेल्या ‘विरा’तर्फे दुपारी १ वाजता संविधान चौकात हे आंदोलन करण्यात आले. अणे यांनी पक्ष स्थापन करण्याची घोषणा केल्यानंतर होत असलेले हे पहिलेच आंदोलन ठरले हे विशेष.
पंडित जवाहरलाल नेहरू व यांच्या आग्रहाने २८ सप्टेंबर १९५३ रोजी महाराष्ट्र हे एकच मराठी भाषिक राज्य करण्याचा ‘नागपूर करार’ अस्तित्वात आला. नागपूर करारात विदर्भाच्या विकासाबाबत काही अटी होत्या. यात लोकसंख्येच्या प्रमाणात विकास निधी खर्च करणे, लोकसंख्येच्या प्रमाणात शिक्षण व शासकीय नोकºयांमध्ये संधी देणे व दरवर्षी राज्याचे शासन निश्चित कालावधीसाठी नागपुरात स्थानांतरित करून एक विधिमंडळीय अधिवेशन घेणे. यापैकी एक विधिमंडळ अधिवेशन नावापुरते घेण्याशिवाय एकही अट पाळली गेली नाही. सातत्याने नागपूर कराराचा गळा कापला गेला. याचा परिणाम म्हणजे विदर्भाच्या लोकांच्या नशिबी बेरोजगार, स्थलांतर आणि शेतकरी आत्महत्या आल्या. या नागपूर कराराला २८ सप्टेंबर रोजी ६३ वर्षे पूर्ण झाली. या कराराचा सातत्याने भंग झाल्याच्या निषेधार्थ विदर्भवादी कार्यकर्ते एकत्र आले होते.