एमएलसीच्या मतदारांना पतसंस्थेतून कर्जस्वरुपात मिळणार रक्कम ?

0
7

खेमेंद्र कटरे

गोंदिया,(berartimes.com)दि.04-भंडारा-गोंदिया विधानपरिषद मतदारसंघासाठी अर्ज भरण्याच्या तारखेनंतर आत्ता उद्या किती उमेदवार आपले अर्ज मागे घेतात याकडे लक्ष लागले असले तरी ही निवडणुक तिरंगी होणार यात शंकाच उरली नाही.विद्यमान आमदार राष्ट्रवादीचे राजेंद्र जैन,काँग्रेसकडून प्रफुल अग्रवाल व भाजपकडून डाॅ.परिणय फुके हे तिन्ही उमेदवार रिंगणात राहणार असल्याने ही निवडणुक तिरंगी होणार आहे.काँग्रेसने यावेळी उमेदवार अधिकृत दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला मात्र निवडणुक जड होणार आहे.या निवडणुकीत पहिल्या पसंतीच्या मतामध्ये कुठलाच उमेदवार विजयी होण्याची आज तरी शक्यता दिसत नसल्याने दुसर्या क्रमांकाच्या मतावरच ही निवडणुक अवलंबून राहणार आहे.काँग्रेस राष्ट्रवादीला मदत करण्याच्या मनस्थितीत नाही.त्यातच राष्ट्रवादीचे काही सदस्यही आपल्याच उमेदवाराला सुरुंग लावण्यासाठी काँग्रेसशी हातमिळवणी लक्ष्मीपुजनाच्या दिवशी करुन बसले आहेत.तर भाजपनेही ही निवडणुक प्रतिष्ठेची केली आहे.भाजपच्या सर्व उमेदवारांनाही ताब्यात घेतले गेले असून कुणीही फुटणार नाही याची काळजी घेतली जात आहे.शिवसेनेवर सर्वच उमेदवारांची भिस्त आहे.

परंतु या तीनपैकी एका उमेदवाराने गोंदिया भंडारा जिल्ह्यातील या निवडणुकीत मतदार असलेल्या मतदारांना टोकन म्हणून दोन ते तीन लाख रुपये रोख देण्यास सुरवात केली आहे.15-18 लाख रुपये देण्याचे मान्य केल्याचे वृत्त असून मतदानाआधीच पैसे दिले आणि आपणास मतदान झाले नाही तर नुकसान होऊ शकतो यासाठी एका उमेदवारांने चांगलीच शक्कल लढविली असून एका पतसंस्थेच्या माध्यमातून या मतदारांचे कर्ज घेतल्याचे अर्ज भरून घेतले जात आहेत.त्या कर्जाच्या माध्यमातून त्या मतदारांना ही रक्कम दिली जाणार आहे.विशेष म्हणजे समजा त्या कर्जाच्या अर्ज्याच्या माध्यमातून भविष्यात तो उमेदवार निवडून आला किंवा नाही आला तरी तुम्ही या पतसंस्थेच्या बँकेच्या माध्यमातून कर्ज घेतले आहे त्याचा व्याज व रकमेची परतफेड करावयाची आहे यासाठी दबावतत्राचा वापरही केला जाऊ शकतो अशा चर्चांना गोंदिया शहरात चांगलेच उधाण आले आहे.कर्जबाजारी मतदार हे या निवडणुकीत उमेदवाराला मतदान करणार अशी चर्चा सुरु असून एका पक्षाच्या हट्टी नेत्याने तर मतदाराकडून कागदावर स्वाक्षरी घेणे सुध्दा सुरु केल्याची ओरड एैकू येऊ लागली आहे.काही जि.प.,नगरसेवकांच्या नातेवाईकांनी तर आमच्या घरच्या सदस्यांना रात्री बेरात्री त्रास देऊन त्यांना फिरण्यासाठी छत्तीसगड मध्ये घेऊन गेल्याचे सांगितले जात आहे.

या निवडणुकीत सहकारी पतसंस्थांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार होण्याची शक्यता असल्याने रिझव्ह बँकेच्या पथकानेच नव्हे तर निवडणुक विभागाने गोंदिया भंडारा जिल्ह्यातील सर्वच सहकारी पतसंस्था यांच्या 1 आक्टोंबर ते 18 नोव्हेंबर दरम्यानच्या कर्ज प्रकरणावर नजर ठेवणे आवश्यक झाले आहे.कर्जाच्या माध्यमातून मिळालेली रक्कम ही त्या मतदाराला सुध्दा भविष्यात चांगलीच डोकेदुखी ठरण्याची शक्यता वर्तविली जात आहे.