शिवसैनिकांचे सामूहिक राजीनामे :पालकमंत्र्याविरूद्ध उफाळला असंतोष

0
13

भोंडेकरांच्या नेतृत्वात मातोश्रीत मांडणार कैफियत

भंडारा,दि.21 : जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. दीपक सावंत हे शिवसेनेचे असतानाही त्यांनी जिल्ह्यातील पक्षसंघटना वाढीकडे दुर्लक्ष केले आहे. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना सन्मानाची वागणूक मिळत नाही. तथा नुकत्याच झालेल्या नगर पालिका निवडणुकीतही त्यांच्याकडून भेदभावाची वागणूक मिळाल्यामुळे शिवसेना पक्ष ‘बॅकफुट’वर आला आहे. त्यामुळे संतप्त शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आज मंगळवारला ‘मातोश्री’वर फॅक्सद्वारे सामूहिक राजीनामे पाठविले. त्यामुळे जिल्ह्यातील शिवसेनेत खळबळ उडाली आहे.या अनुषंगाने मंगळवारी माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक शासकीय विश्रामगृहात पार पडली. यात जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री डॉ.सावंत यांच्या कार्यप्रणालीवर रोष व्यक्त करून ‘मातोश्री’वर सामूहिक राजीनाम्याचे फॅक्स केले.
सोमवारला जिल्ह्यातील भंडारा, तुमसर, पवनी व साकोली या चार नगरपालिका निवडणुकीचा निकाल घोषित झाला. यात पवनी पालिकेवर मागीलवेळेस सत्ता काबीज करणाऱ्या शिवसेनेला केवळ एका नगरसेवकावर समाधान मानावे लागले आहे. याला जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.दीपक सावंत हे जबाबदार असल्याचा रोष व्यक्त करण्यात आला आहे. डॉ.सावंत यांच्यावर भंडारा जिल्ह्यात शिवसेना पक्षवाढीसाठी जबाबदारी सोपविली होती. मात्र डॉ.सावंत हे येथे स्वत:चे राजकारण करून पक्ष संघटना वाढीकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप या संतप्त शिवसैनिकांकडून आता होत आहे.
यात प्रामुख्याने भंडारा नगराध्यक्षपदाचे उमेदवार सूर्यकांत इलमे, जिल्हा परिषद सदस्य जया सोनकुसरे, भंडारा पंचायत समितीचे उपसभापती ललीत बोंद्रे, उपजिल्हाप्रमुख अनिल गायधने, उपजिल्हाप्रमुख संजय रेहपाडे, पंचायत समिती सदस्य विश्वजीत घरडे, पवनी तालुकाप्रमुख विजय काटेखाये, तुमसर शहरप्रमुख कमला निखाडे, उपजिल्हाप्रमुख नरेश बोपचे, बालू फुलबांधे, साकोली तालुकाप्रमुख नरेश करंजेकर, गणेशपूर ग्रामपंचायतचे उपसरपंच यशवंत सोनकुसरे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.दरम्यान, भंडारा जिल्ह्यात शिवसेनेची होत असलेली वाताहत याबाबत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना माहिती देण्याच्या अनुषंगाने हे संतप्त पदाधिकारी दोन दिवसात मुंबईला जावून मातोश्रीवर त्यांची भेट घेणार आहेत.