महापालिकेच्या भ्रष्टाचाराला मुख्यमंत्रीही जबाबदार – राहुल शेवाळे

0
9

मुंबई, दि. २८ – महापालिकेचे प्रशासकीय प्रमुख असणाऱ्या आयुक्तांची नेमणूक मुख्यमंत्र्यांकडून केली जाते. पालिकेतील प्रस्ताव मंजूर करून अंतिम निर्णय घेण्यासाठी स्थायी समितीपेक्षा आयुक्त व नगरविकास विभाग महत्त्वाचा असतो आणि त्याचे प्रमुखही मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेत घोटाळे झाले असले तर तेही त्याला जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांनीच याचे उत्तर द्यावे, असा टोला शिवसेनेने भाजपाला लगावला आहे. पालिका निवडणुकीसाठी युतीचा ‘ब्रेकअप’ झाल्यानंतर दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप वाढत आहेत. शिवसेनेचे खासदार व पालिकेचे माजी स्थायी समिती सभापती राहुल शेवाळे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन भाजपाचे खासदार किरीट सोमय्या यांनी मुंबई महापालिकेवर केलेल्या प्रत्येक आरोपाचा समाचारही घेतला.
ते म्हणाले, ‘लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सर्वात जास्त कारवाई भाजपाच्या नगरसेवकांवर केलेली आहे. राज्य सरकारच्या भाजपाचे मंत्री असलेल्या खात्यात सर्वाधिक भ्रष्टाचार असून मुख्यमंत्र्यांच्या ताब्यातील गृह खात्यातही पारदर्शकता नाही. टॅँकर घोटाळ्याचा आरोप करणाऱ्या सोमय्या यांच्या मतदारसंघात शिवाजी नगरमध्ये टँकरने पाणी पुरवण्यासाठी त्यांच्या सहीची पत्रे आहेत. १५० रुपयांचे टँकर्स ७०० ते ८०० रुपयांना विकले, असा आरोप शेवाळे यांनी केला. मुलुंड डंपिंग ग्राउंडच्या बाजूला आकृती डेव्हलपर्स आणि बिल्डरला फायदा पोहोचवण्यासाठी ते डंपिंग ग्राउंड बंद करण्याची किरीट यांनी मागणी केली. जय श्रॉफ या कंत्राटदारावर किरीट सोमय्या यांनी कचरा घोटाळ्याचा आरोप केला होता. मात्र त्याच्यासमवेतच ‘कोल्ड प्ले’चा कार्यक्रम केला, असे म्हणत शेवाळेंनी मुख्यमंत्र्यांसोबतचे त्याचे फोटोही दाखवले.