जिवंत बाळाला मृत घोषित करण्याचा डॉक्टरांचा हलगर्जीपणा

0
11

वाशिम,दि.28: वाशिम जिल्ह्यातील कारंजामध्ये जिवंत बाळाला मृत घोषित करण्याचा हलगर्जीपणा येथील डॉक्टरांनी केला आहे. डॉक्टरांनी बाळाचा मृत्यू झाल्याचे सांगितल्याने कुटुंबियांनी अंत्यविधीची तयारी केली. पण जेव्हा बाळाचा चेहरा पाहावा यासाठी बाळाच्या अंगावरुन कापड काढले. तेव्हा बाळ जिवंत असल्याच लक्षात आले. या घटनेनंतर कारंजा शहरात एकच खळबळ माजली असून, कुटुंबियांनी डॉक्टरांविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली आहे.कारंजा येथील डॉ.जेसवाणी हॉस्पीटलमध्ये 25 जानेवारीला आकाशी गगन रॉय यांनी गोंडस बाळाला जन्म दिला. पण हे बाळ थोड्याच वेळात मृत झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केले. बाळाला मृत घोषित केल्याने रॉय कुटुंबियांनी अंत्यविधीची तयारी केली होती. परंतु अंत्यविधी करण्यापूर्वी बाळाला पाहण्यासाठी गुंडाळलेल्या कापडातून बाहेर काढले, तेव्हा गगन रॉय यांच्या भावाला बाळ हालचाल करीत असल्याचे दिसले.यानंतर रॉय कुटुंबियांनी बालरोग तज्ज्ञांना दाखविले असता, त्यांनी बाळ जिवंत असल्याचे सांगितले आणि पुढील उपचारासाठी त्याला अमरावती येथील खाजगी रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला.सध्या अमरावती येथील होप हॉस्पिटल येथे बाळाचा उपचार सुरु असून, या प्रकारामुळे डॉक्टरांचा निष्काळजीपणा समोर आला आहे. रॉय कुटुंबांनी या प्रकरणी कारंजा पोलिसांत डॉ. अमृता जेसवानी आणि डॉ. रजनी राठोड यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.