डॉ. गार्गी चोप्रा यांचा राजीनामा मागे

0
5

नागपूर दि. 9- महापालिकेची निवडणूक जिंकल्यानंतर लगेच राजीनामा देऊन कॉंग्रेसला धक्का देणाऱ्या डॉ. गार्गी चोप्रा यांनी आज आपला राजीनामा मागे घेतला. त्यामुळे कॉंग्रेसला दिलासा मिळाला तर फेरनिवडणुकीकडे नजर ठेवून असलेल्या भाजप व कॉंग्रेसमधील काही इच्छुकांचा हिरमोड झाला.कॉंग्रेसच्या गार्गी चोप्रा प्रभाग क्रमांक 10 मधून सुमारे चार हजार मतांच्या आघाडीने निवडून आल्यात. मात्र, त्यांच्यासोबत लढणाऱ्या कॉंग्रेसच्या उमेदवारांना तुलनेत फारच कमी आघाडी मिळाली. यावरून आपसातच मतभेद निर्माण झाले होते. यामुळे त्यांनी स्पीडपोस्टने नगरसेवक पदाचा राजीनामा कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, शहर अध्यक्ष विकास ठाकरे तसेच महापालिका आयुक्तांना पाठविला होता. यामुळे कॉंग्रेसमध्ये चांगलीच खळबळ उडाली होती. आधीच कॉंग्रेसचे 29 नगरसेवक निवडून आलेत. त्यात आणखी एकाने घट होणार असल्याने कॉंग्रेसच्या नेत्यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. महापालिका आयुक्तांनी बुधवारी त्यांना प्रत्यक्ष भेटण्यासाठी बोलावले होते. गार्गी चोप्रा यांनी आपण राजीनामा मागे घेत असल्याचे सांगून गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर पडदा टाकला. डॉ. प्रशांत चोप्रा, कॉंग्रेसचे गटनेते संजय महाकाळकर आणि ज्यांच्याशी वाद झाला अशी चर्चा होती, ते नगरसेवक नितीश ग्वालवंशी यावेळी गार्गी चोप्रा यांच्यासोबत होते.