शिवसेनेच्या भूमिकेमुळे मध्यावधीची शक्यता-विनायक मेटे

0
6

नागपूर,दि.10 : राज्यभरात शेतकरी आंदोलनाचे लोण पेटले आहे. या मुद्यावरून आता सर्वच विरोधी पक्ष सरकारच्या विरोधात एकवटले आहे. शिवसेना सत्तेत भागीदार आहे. मात्र, संधी मिळेल तेव्हा सरकारचा विरोध करीत आहे. सरकारमध्ये राहून आंदोलन करीत आहे. शिवसेनेची ही भूमिका पाहता राज्यात मध्यावधी निवडणुका होण्याची शक्यता वाटते, असे मत शिवसंग्रामचे संस्थापक व भारतीय संग्राम परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आ. विनायक मेटे यांनी व्यक्त केले.

शिवसंग्रामप्रणित भारतीय संग्राम परिषदेचा मेळावा व पदग्रहण सोहळा शुक्रवारी देशपांडे सभागृहात पार पडला. या वेळी शिवसंग्रामचे प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे, भारतीय संग्राम परिषदेचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष सुबोध मोहिते, उदय टेकाडे, राजेश कडू आदी उपस्थित होते. यावेळी विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांनी प्रवेश घेतला. या वेळी मेळाव्यात व नंतर पत्रकारांशी बोलताना मेटे म्हणाले, शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे, असे आपले मत आहे. मात्र त्यासाठी शेतकरी व सरकारमध्ये संवाद होणे आवश्यक आहे. नोकरदारांना ज्या प्रमाणे निवृत्ती वेतन मिळते, त्याच धर्तीवर ६० वर्र्षांंवरील शेतकरी, शेतमजुराला दरमहा एक हजार रुपये पेन्शन देण्याची मागणी त्यांनी केली. याशिवाय सरकारने शेतकऱ्यांच्या सर्वच पिकांचा विमा काढून त्याचे प्रीमिअम स्वत: भरावे, अशी मागणीही त्यांनी केली. शिवसंग्रामतर्फे जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुका लढविल्या जातील. भाजपाने होकार दिला तर सोबत लढू, अन्यथा मैत्रीपूर्ण लढत देऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले.