नितिशकुमार भाजपसोबत थाटणार संसार, आज शपथविधी

0
7

पाटणा,दि.27(वृत्तसंस्था)-बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा फासे पलटले. महाआघाडी सरकारचे नेतृत्व करणारे नितीशकुमार मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर दोनच तासांत एनडीएचे झाले. बुधवारी सायंकाळी ६.३५ वाजता राजीनामा देणारे नितीश यांनी रात्री ९ वाजता भाजपच्या पाठिंब्यावर सरकार स्थापनेचा दावाही केला.आज सकाळी 10 वाजता भाजपच्या पाठिब्याने नितिशकुमार पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.याआधी सुध्दा त्यांनी भाजपसोबत सत्ता उपभोगली आहे.
२०१४ मध्ये नितीश यांनी भाजपशी १७ वर्षांपासूनची मैत्री जातीयवादाच्या मुद्द्यावर तोडली होती. आता २० महिन्यांपासून असलेली लालूंची संगत भ्रष्टाचाराच्या अारोपावरून सोडली. लालूंचे पुत्र व बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून सायंकाळी नितीश यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. ते म्हणाले, ‘मी अंतरात्म्याचा आवाज ऐकून हे पाऊल उचलले.’ राजीनाम्याच्या ३६ मिनिटांनी पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करून नितीशना शुभेच्छा दिल्या. भाजपनेही विलंब न करता पाठिंबा देत सरकारमध्ये सहभागी होण्याचे जाहीर केले. नितीश यांनी रात्री सरकार स्थापनेचा दावाही केला. गुरुवारी सकाळी १० वाजता शपथविधी होईल. नव्या सरकारमध्ये भाजपचे सुशील माेदी उपमुख्यमंत्री असतील. दोघांचे प्रत्येकी १३ मंत्री असतील. आता केंद्र सरकारमध्ये जदयू सहभागी होईल. दरम्यान, तेजस्वी यांनीही अामदार सोबत घेऊन सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी राजभवनाच्या दिशेने रात्री दीडच्या सुमारास कुच केली होती.