विदर्भाचा निर्णय झाला तर राकाँ सोबत असणार

0
10

चंद्रपूर,दि.17ः- निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांनी वेगळय़ा विदर्भाच्या मुद्दय़ावर बोलत होते. परंतु, सत्तेत आल्यावर त्यांच्या भूमिका बदलल्याचे जाणवते. गडकरी तर आता विदर्भ सक्षम झाल्यानंतर त्याचे राज्य करू असे म्हणतात. परंतु, वैदर्भिय जनतेला विदर्भ वेगळा पाहिजे असेल तर तसा निर्णय शासनाने घ्यावा. विदर्भाचा निर्णय झाला तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या निर्णयासोबत असणार अशी स्पष्टोक्ती राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांनी दिली.ते चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित मीट-द-प्रेस कार्यक्रमात बोलत होते. यावेळी मंचावर माजी मंत्री अनिल देशमुख, आ. प्रकाश गजभिये, रमेश बंग, आ. संदीप बजोरिया, जिल्हाध्यक्ष संदीप गड्डमवार, संघाचे अध्यक्ष प्रमोद काकडे, सचिव प्रशांत विघ्नेश्‍वर यांची उपस्थिती होती. खा. पवार म्हणाले, राज्यात शेतकर्‍यांची स्थिती दयनिय असून त्यांच्या मालाला योग्य भाव मिळणे क्रमप्राप्त आहे.
शेतकर्‍यांना योग्य भाव मिळावा यासाठी शासनाला निर्यातीतून मिळणारा कर हा सरकारने स्वत:कडे न ठेवता त्या कराची रक्कम शेतकर्‍यांना दिल्यास त्यांना काही प्रमाणात दिलासा मिळू शकेल असा सल्ला दिला होता. परंतु, त्याबाबत अजुनपर्यंत शासनाने निर्णय घेतलेला नाही. शेतकर्‍यांचा माल हा व्यापार्‍यांनीच खरेदी करावा असा कोणताच कायदा नाही. निर्धारित मूल्यापेक्षा कमी भाव मिळत असेल तर शासनाने बाजारात उतरुन स्वत: खरेदी केली पाहिजे. तेव्हाच शेतकर्‍यांना हमीभाव मिळू शकतो.
खा. पवारांनी राहूल गांधी यांच्या कार्यशैलीवर विशेष वक्तव्य केले. ते म्हणाले, गुजरातची निवडणूक राहूल गांधींनी गंभीरपणे घेतली आहे. जो आक्रमकपणा त्यांच्या भाषणात यापूर्वी नव्हता, तो आता दिसतो आहे. त्यातही महत्त्वाचे म्हणजे आक्रमकतेचे सातत्य त्यांनी टिकवून ठेवले आहे. यावेळी पवार यांचा पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेंद्र वैद्य, मोरेश्‍वर टेंमुर्डे, राजीव कक्कड, शशिकांत देशकर, नितीन भटारकर, अँड. बाबासाहेब वासाडे, बेबी उईके, दिपक जयस्वाल, ज्योती रंगारी, सुनील दहेगांवकर, हिराचंद बोरकुटे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमोद काकडे यांनी तर संचालन आशिष अंबाडे यांनी केले. प्रशांत विघ्नेश्‍वर यांनी आभार मानले.