काँग्रेसच्या कामाचे श्रेय सरकार लाटते

0
10

नागपूर,दि.11 : गेल्या तीन वर्षात सरकारने महाराष्ट्र उद्ध्वस्त करण्याचे काम केले. सरकारने केलेली कामे दिसलीच नाहीत, म्हणून कोट्यवधी रुपये खर्च करून ‘मी लाभार्थी, हे माझे सरकार’ अशा फसव्या जाहिराती करण्यात आल्या. या सरकारचा सामान्याला लाभच झाला नाही. भाजपा व शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे हे दोन या सरकारचे खरे लाभार्थी आहेत, अशी बोचरी टीका विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांनी केली.

विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बंगल्यावर विरोधी पक्षाची बैठक झाली. या बैठकीनंतर संयुक्त पत्रकार परिषदेत विखे पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आदींनी सरकार सर्वच प्रश्नांवर अपयशी ठरल्याचा आरोप करीत सरकारच्या चहापानावर बहिष्कार घालण्याची घोषणा केली. तीन वर्षात सरकार कोणकोणत्या मुद्यांवर अपयशी ठरले याचा एक फलकच विरोधकांनी तयार करून लावला आहे.  या फलकाकडे इशारा करीत विखे पाटील म्हणाले, सरकारने दिलेली आश्वासने पाळलेली नाहीत. आता जनता ‘क्या हुवा तेरा वादा..’ असे मुख्यमंत्र्यांना विचारू लागली आहे. जनतेसोबतच आता भाजपाच्या खासदार, आमदारांमध्ये खदखद सुरू झाली आहे. नाना पटोले यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. ओखी वादळ हे नैसर्गिक संकट होते, तर भाजपाचे सरकार सुलतानी संकट आहे. हे दोन्ही संकट गुजरातमार्गे महाराष्ट्रात दाखल झाले, अशी टीकाही त्यांनी केली. हे सरकार माहिती तंत्रज्ञानावर चालत असून ऑनलाईन आकडे व ऑफलाईन आकड्यांवर चालते. या सरकारमध्ये खरा लाभार्थी जर कुणी असेल तर ऑनलाईनचा घोळ करणारी ‘ईनेव्हो’ कंपनी आहे. या कंपनीने केलेल्या घोळामुळेच शेतकर्‍यांना आजपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. मुख्यमंत्र्यांनी ही ऐतिहासिक कर्जमाफी असल्याचे सांगून स्वत:ची पाठ थोपवून घेतली होती. मात्र, संपूर्ण राज्यात असा एकही शेतकरी भेटला नाही ज्याच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा झाली आहे. महाराष्ट्राची पारदर्शकता वेडी झाली आहे. शेतकर्‍यांना एकरी २५ हजार मदत मिळावी, यासाठी सभागृहात आम्ही आवाज उठवणार असल्याचे अशोक चव्हाण यांनी पत्रपरिषदेत सांगितले.