गोंदिया जिपमध्ये भाजप-कॉंग्रेस मैत्री घट्ट…

0
15
  • अध्यक्षपदासाठी कॉंग्रेसच्या सीमा मडावी तर उपाध्यक्षपदासाठी भाजपचे हमीद अल्ताफ अकबरअली यांची उमेदवारी पक्की
  • भाजपच्या रजनी कुंभरे यांच्या अध्यक्षपदाचा आणि कॉंग्रेसचे रमेश अंबुले यांचे उमेदवारी अर्ज मागे
  • भाजप-कॉंग्रेसमध्ये पुन्हा सेटींग

गोंदिया,दि.15ः- गोंदिया जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी आज घेण्यात येणाऱ्या निवडणुकीत पुन्हा एकदा भाजप-कॉंग्रेस मैत्रीवर शिक्का मोर्तब करण्यात आले. अंतिम क्षणी भाजपने आपल्या अध्यक्षपदाचा तर कॉंग्रेसने आपल्या उपाध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने या निवडणुकीतील निकाल जवळपास अंतिम समजण्यात येत आहे. जिपच्या सभागृहात राष्ट्रवादी हा सर्वात मोठा पक्ष असून कॉंग्रेसने भाजपशी हातमिळवणी करून आपल्या नैसर्गिक मित्राला सत्तेबाहेर ठेवण्याची खेळी यशस्वी करून दाखविली आहे. परिणामी, अध्यक्षपदावर फुलचूर जिप क्षेत्राच्या कॉंग्रेसच्या सीमा कुंभरे आणि उपाध्यक्षपदी चिचगड जि.प. क्षेत्राचे भाजपचे हमीद अल्ताफ अकबरअली यांची वर्णी लागणार असल्याचे निश्चित मानले जात आहे.

उल्लेखनीय म्हणजे सभागृहात राष्ट्रवादी हा सर्वात मोठा पक्ष असून त्यांची सदस्य संख्या 20 आहे. भाजप 17 आणि कॉंग्रेसकडे मात्र 16 सदस्य आहेत. गोंदिया जिल्हा परिषदेच्या राजकारणात भाजप -कॉंग्रेस युती काही नवीन नाही. राष्ट्रीय व प्रांतीय पातळीवर कट्टर वैर असताना गोंदियात मात्र या दोन्ही पक्षात चवदार खिचडी नेहमीच शिजत आली आहे. असे असले तरी राष्ट्रीय पातळीवर सध्या तापत असलेले राजकारण बघितल्यास यावेळी बदल होण्याची आशा राजकीय समीक्षक व्यक्त करीत होते. असे असले तरी मुंबईवरून भाजपच्या गोटातून गोंदियातील नेत्यांनी जास्त लुडुबूडू न करण्याची सक्त ताकीद मिळ्याल्याचे सांगण्यात येते. भाजपच्या केंद्रीय मंडळानेसुद्धा कॉंग्रेसला अध्यक्षपद देण्याची सूचना करून जैसे थेची स्थिती कायम ठेवण्यास सांगण्यात आल्याचे समजते. यावरून भाजप आणि कॉंग्रेसच्या उमेदवारांनी 33 मते तर राष्ट्रवादीच्या उमेदवारांना केवळ पक्षाची 20 मते पडण्याची शक्यता आहे.