पक्ष सोडायला भाग पाडू नका, राजकारणात काहीही शक्य; एकनाथ खडसें

0
19

रावेर,दि.25- पक्ष सोडण्याचा विचार नाही. पण पक्षातील लोक मला पक्षातून ढकलून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. पक्षाने दूर केल्यास पर्याय उरणार नाही, राजकारणात काहीही शक्य आहे, अशा शब्दात भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपला सज्जड इशारा दिला आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजीव पाटील यांच्या एकसष्टी गौरव सोहळ्यात एकनाथ खडसे उपस्थित होते. व्यासपीठावर खडसे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण एकत्र आले. उभय नेत्यांमध्ये चर्चाही झाली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, भोसरी एमआयडीसी प्रकरणानंतर मंत्रिपद सोडावे लागल्याने नाराज झालेल्या एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा भाजपवर तोफ डागली. ‘आपण पक्ष सोडणार नाही. मात्र पक्ष सोडायला जर तुम्ही मला भाग पाडाल तर माझ्यासमोर पर्याय उरणार नाही, असा सुचक इशाराही त्यांनी दिला आहे.

आपण अशा काय भानगडी केल्यात, माझ्या‍बद्दल जाणून घेण्याची जनतेच्या मनात उत्सूकता आहे. गुन्हेगार असेल तर आपल्याला तुरुंगात टाका, असे खुले आव्हान खडसेंनी यावेळी दिले. आपण कुठे पैसा कमविला, कुठे भ्रष्टाचार केला, हे आपल्याला पक्षाकडून उत्तर हवे आहे.