काँग्रेस- राष्ट्रवादीत आघाडी करण्याबाबत एकमत

0
7

मुंबई,दि.06(वृत्तसंस्था)- काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक मंगळवारी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या बंगल्यावर पार पडली. या बैठकीत दोन्ही पक्षात आघाडी करण्यासोबतच आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन वाटाघाटी झाल्या. भाजप आणि शिवसेना यांच्यातील अंतर वाढत चालले असताना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एकत्र येण्याची हालचाली सुरू केल्या आहेत..काँग्रेस- राष्ट्रवादीतील आजच्या या बैठकीला काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, धनंजय मुंडे, माणिकराव ठाकरे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आदी नेते उपस्थित होते.

आजच्या बैठकीत उभयपक्षातील नेत्यांत काही मतभेद सोडून धर्मनिरपेक्षतेसह भाजपकडून लोकशाहीला असलेल्या धोक्याच्या मुद्यावर एकत्र येण्याबाबत चर्चा झाली. तसेच मतविभाजन टाळणे गरजेचे असल्याचे दोन्ही पक्षांतील एकमत झालं. आघाडी करायची झाल्यास ती कशी असावी याबाबत दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी प्राथमिक स्तरावर चाचपणी केली. पुढील निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल असे अशोक चव्हाण व सुनील तटकरे यांनी बैठकीनंतर स्पष्ट केले. राष्ट्रवादीसोबत कडवटपणा आमच्यात कधीच नव्हता. सर्व पक्षांनी भाजपविरोधात मोट बांधांवी व मतांचे विभाजन टाळण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेससोबत यावे अशी आमची इच्छा असल्याचेही अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले.दरम्यान, या घडामोडीसह सद्य स्थितीतील राजकीय स्थितीी पाहता भाजपात हालचाली सुरू झाल्या आहेत. राजस्थानातील धक्‍कादायक पराभवानंतर आता सर्वत्र वातावरण योग्य व्हावे यासाठी लवकरात लवकर वातावरण बदलण्याचे भाजपकडून प्रयत्न केले जाणार आहेत. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यासंदर्भात कोअर कमिटीची बैठक लवकरच घेणार असल्याचे समजते