सभापतींवरील अविश्‍वास ठरावाचा तिढा कायम

0
5

मुंबई – विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसने दिलेल्या अविश्‍वास ठरावावर दोन्ही कॉंग्रेसच्या प्रमुख नेत्यांमध्ये चर्चेच्या फेऱ्या सुरू असून, या मुद्द्यावर अद्याप तोडगा निघाला नाही. दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची रात्री उशिरा चर्चा अपेक्षित असून, या संदर्भात योग्य मार्ग काढला जाईल, असे विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले, तसेच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यात चर्चा होणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

लोकसभेपाठोपाठ झालेल्या विधानसभा निवडणुकीत दोन्ही कॉंग्रेसमधील मतभेद चव्हाट्यावर आले होते. निवडणुकीतील पराभवानंतर दोन्ही पक्षांनी एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडली नाही. विधानसभेत कॉंग्रेसपेक्षा कमी जागा असतानाही राष्ट्रवादी कॉंग्रेसने विरोधी पक्ष नेतेपदावर दावा केला होता. त्यानंतर विधान परिषदेत कॉंग्रेसपेक्षा अधिक संख्याबळ असल्याने नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात राष्ट्रवादी कॉंग्रेसने सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या विरोधात अविश्‍वासाचा ठराव मांडला. आता हा प्रस्ताव उद्यापासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पी अधिवेशनात चर्चेला येणार असल्याने दोन्ही कॉंग्रेसच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

फडणवीस सरकारची एकत्रितपणे कोंडी करण्यासाठी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मैत्रीपर्व आजपासून सुरू झाले. मात्र, सभापतींवरील अविश्‍वास ठरावाचे काय करायचे, याबाबतचा निर्णय रात्री उशिरा किंवा उद्या घेण्यात येणार असल्याचे संकेत दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी दिले. विधिमंडळात सरकारचा सामना करण्यासाठी दोन्ही कॉंग्रेसची एकत्रित मोट बांधण्यावर दोन्ही पक्षांच्या नेत्यांत एकमत झाले. यासाठी सुरवातीला स्वतंत्र आणि त्यानंतर संयुक्‍त बैठका आज पार पडल्या. सभापतींवरील अविश्‍वासाचा ठराव मागे घेण्यासाठी राष्ट्रवादीवर दबाव आणण्याचा निर्णय कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत घेण्यात आला, तर दुसरीकडे याच मुद्द्यावर उपसभापती वसंत डावखरे यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी कॉंग्रेसची बैठक पार पडली. कॉंग्रेसच्या बैठकीला राधाकृष्ण विखे पाटील, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माणिकराव ठाकरे, संजय दत्त आदी उपस्थित होते, तर “राष्ट्रवादी‘च्या बैठकीला अजित पवार, सुनील तटकरे, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. कॉंग्रेसचा प्रस्ताव आल्यानंतर योग्य तो निर्णय घेण्याचे राष्ट्रवादीच्या बैठकीत ठरल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.