येत्या ११ एप्रिलला तासगाव, वांद्रेची पोटनिवडणूक

0
5

मुंबई- राज्य निवडणूक आयोगाने आज माजी गृहमंत्री व राष्ट्रवादीचे नेते आर आर पाटील व शिवसेनेचे आमदार प्रकाश (बाळा) सावंत यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या तासगाव-कवठेमहांकाळ व वांद्र (पूर्व) या विधानसभा मतदारसंघासाठी येत्या ११ एप्रिलला पोटनिवडणूक होईल अशी माहिती दिली.

शिवसेनेचे मुंबईतील वांद्रे (पूर्व)चे आमदार प्रकाश (बाळा) सावंत यांचे ८ जानेवारी २०१५ रोजी निधन झाले होते. तर, तासगाव-कवठेमहांकळचे प्रतिनिधित्त्व करणारे राष्ट्रवादीचे नेते व माजी गृहमंत्री आर आर पाटील यांचे १६ फेब्रुवारी रोजी कर्करोगाने निधन झाले होते. त्यामुळे या दोन जागा रिक्त झाल्या आहेत. बाळा सावंत यांच्या जागी उद्धव ठाकरे कोणाला संधी देतात याकडे लक्ष आहे.

दरम्यान, आर आर पाटील यांच्या जागी त्यांच्या पत्नी सुमन पाटील यांना उमेदवारी देण्याची मागणी आबांच्या समर्थकांनी केली आहे. काँग्रेसचे माजी खासदार प्रतिक पाटील यांनीही आबांच्या पत्नीला उमेदवारी द्यावी असे वक्तव्य केले आहे. आबांच्या घरात उमेदवारी दिल्यास काँग्रेस उमेदवार देणार नाही असेही प्रतिक पाटील यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने अद्याप याबाबत कोणतेही निर्णय घेतला नाही.