सावकारी कर्जमाफी नाहीच, सरकारने शेतक-यांची घोर फसवणूक केली- अजित पवार

0
6

मुंबई- नागपूरमधील हिवाळी अधिवेशनात शेतक-यांनी सावकारांकडून घेतलेले 350 कोटींचे कर्ज माफीची घोषणा केली मात्र, शेतक-यांचे कर्ज माफ केलेच नाही. फडणवीस सरकारने अशी घोषणा करून शेतक-यांची घोर फसवणूक केली आहे अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. राज्यात भाजप सरकार आल्यापासून कायदा आणि सुव्यवस्था ढासळली असून, अंडरवर्ल्ड व माफियांचे राज्य आले असल्याची टीका मुख्यमंत्र्यांवर केली आहे.माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप सरकारवर हल्लाबोल करताना सांगितले की, राज्यात कायदा- सुव्यवस्था राहिलेली नाही. नागपुरात दिवसाढवळ्या व्यापा-याचा खून झाला आहे. मुंबई पोलिसांच्या लॉकरमध्ये ड्रग्ज सापडत आहेत. सत्ताधारी सरकारच्या आमदारांना अंडरवर्ल्डच्या खुलेआम धमक्या येत आहेत. जितेंद्र आव्हाड यांना मारण्याच्या धमक्या येत आहेत. त्यामुळे या राज्यात चाललंय तरी काय असा प्रश्न पडतो. मुख्यमंत्र्यांवर कामाचा ताण असेल तर त्यांनी गृह खात्याचा राजीनामा द्यावा, अशी मागणी पवार यांनी केली.
ठाण्याचे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांना अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीने जीवे धमकी दिल्याची धक्कादायक घटना उजेडात आली आहे. गेले 10 दिवस आमदार प्रताप सरनाईक यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना सतत फोन करून जीवे मारण्याची धमकी देण्यात येत आहे. तो धागा पडकून अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.
राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. अवकाळी पाऊस, गारपीट यांमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असताना त्यांना आधार देण्याचं काम सरकारने करणे गरजेचे आहे. मात्र सरकार काहीही निर्णय घेताना दिसत नाही. आमचे राज्यात आणि केंद्रात सरकार असताना राज्यातील शेतक-यांना 7 हजार कोटींचे पॅकेज दिले. मात्र, या सरकारने किती पैसे दिले याची त्यांच्या मंत्र्यांनाच माहिती नाही. राज्यातील शेतकरी अस्वस्थ आहे. शेतक-यांना अद्याप मदत मिळाली नाही. केंद्रात आणि राज्यात आता भाजप सरकार असतानाही राज्याला एक रूपयाचीही मदत दिली जात नाही ही शोकांतिका आहे. सावकारी कर्जमाफी निव्वळ फसवी घोषणा सरकारने केल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले आहे. महाराष्ट्रातल्या 80 टक्के शेतकऱ्यांना बैल म्हातारा झाल्यावर सांभाळता येत नाही, त्यामुळे सरकारने कायदा करताना भावनेला हात न घालता भाकड, निरूपयोगी जनावरांसाठी गोशाळा उभारून त्यांना सांभाळण्याची जबाबदारी घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली.