महापालिका – नगरपालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेबरोबर युतीचा प्रयत्न-भाजपा प्रदेशाध्यक्ष

0
10

मुंबई-आगामी नवी मुंबई व औरंगाबाद महानगरपालिका व विविध नगरपालिकांच्या निवडणुकात भारतीय जनता पार्टी व शिवसेनेने युती करून लढावे, असा आमचा प्रयत्न असून पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब पाटील दानवे यांनी बुधवारी सांगितले.

भाजपा प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर मा. रावसाहेब पाटील दानवे यांनी प्रथमच मातोश्री या निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. उभय नेत्यांमध्ये आगामी महापालिका व नगरपालिका निवडणुका तसेच बांद्रा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक याविषयी चर्चा झाली. दोन्ही पक्षांच्या संबंधांसह विविध विषयांवर दोन्ही नेत्यांनी चर्चा केली.बांद्रा मतदारसंघात भाजपा शिवसेनेला पूर्ण सहकार्य करेल, असे मा. रावसाहेब पाटील दानवे यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले की, महापालिका व नगरपालिका निवडणुकांमध्ये दोन्ही पक्षांनी एकत्रितपणे युती करून लढावे, यासाठी आपण प्रयत्न करू. याबाबत पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले जाईल. स्थानिक पातळीवर दोन्ही पक्षातील पदाधिकाऱ्यांना एकत्र बसून निर्णय घ्यावे लागतील. दोन्ही पक्षांमध्ये योग्य रितीने जागावाटप होण्यासाठी आपण प्रयत्न करू.युतीचा फायदा सर्वांनाच होईल, असे त्यांनी सांगितले.