राज्य व केंद्रातील सरकारने बेरोजगारी वाढविली -खा.प्रफुल पटेल

0
14

गोंदिया,दि.28 : भाजपाने २०१४ च्या निवडणुकीत मोठमोठाली आश्वासने दिली होती. जनतेच्या अपेक्षा वाढल्या होत्या. मात्र पाच वर्षात सर्वच आघाड्यांवर भाजपा सरकार अपयशी झाले.नोकर भरती बंद केल्याने बेरोजगारी वाढली.ओबीसीचे मंत्रालय नावापुरतेच राहिले,शिष्यवृत्ती दिली नाही, सिंचन, धान उत्पादकांच्या प्रश्नांसह विविध प्रश्न कायम आहेत. त्यामुळे या निवडणुकीत जनता योग्य निर्णय घेईल, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल पटेल यांनी प्रसारमाध्यमांशी  बोलताना सांगितले.
राष्ट्रवादी-काँग्रेसचे उमेदवार नाना पंचबुद्धे यांनी नामांकन दाखल केल्यानंतर खासदार पटेल प्रसारमाध्यमांशी बोलत होते. बेरोजगारी ही मुख्य समस्या आहे. भंडारा जिल्ह्यात मंजुर झालेला भेल प्रकल्प अद्यापही सुरू झाला नाही. जीएसटी आणि नोटबंदीनंतर लहान व्यापार बंद पडले.भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील शासकीय नोकरभरतीमध्ये अद्यापही ओबीसींच्या अनुशेषाकडे लक्ष देण्यात आलेले नाही.विद्यार्थ्यासांठी वसतीगृह सुरु केलेले नाही.
भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द हा महत्वाकांक्षी प्रकल्प भाजपाच्या काळात निधी अभावी रखडला आहे. आमच्या काळात आम्ही या प्रकल्पाला राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा देवून भरपूर निधी दिला. परंतु भाजपा सरकारने या प्रकल्पाकडे दुर्लक्ष केले. परिणामी सिंचनाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे, असे त्यांनी सांगितले.धान उत्पादक शेतकऱ्यांना आमच्या काळात तीन हजारापर्यंत भाव दिले. परंतु भाजपाचे सरकार आल्यानंतर धानाचे भाव दोन हजाराच्यावर गेले नाही. यंदा सरकारने ५०० रूपये बोनसची घोषणा केली. मात्र तिही उशिरा केली. त्यामुळे या बोनसचा फायदा शेतकऱ्यांना कमीच झाला असून अद्यापर्यंत बोनसचे पैसेही शेतकऱ्यांना मिळाले नाही, असे त्यांनी सांगितले.

म्हणून आम्ही लोकसभेच्या रिंगणात उतरलो नाही
मी राज्यसभेचा सदस्य असून माझा कार्यकाळ आणखी सव्वा तीन वर्ष आहे. सध्या विधानसभेत आमच्याकडे हवे तेवढे संख्याबळ नाही. त्यामुळे राज्यसभेची जागा आम्हाला गमवावी लागली असती त्यामुळेच आम्ही उमेदवारी नाकारली. मात्र भंडारा आणि गोंदिया दोनही जिल्ह्यातील नागरिक आग्रही होते. उमेदवाराच्या नावाची आधी घोषणा केली असती तर जनतेने आम्हाला सळो की पळो करून सोडले असते आणि उमेदवारी दाखल करायला बाध्य केले असते. त्यामुळे ऐन वेळेवर उमेदवाराच्या नावाची घोषणा केली. नाना पंचबुद्धे हे सौम्य स्वभावाचे असून राज्याचे शिक्षण राज्यमंत्री होते. सर्वांना आपलेसे करण्याचे गुण त्यांच्यात असल्यानेच आपण त्यांना उमेदवारी दिल्याचे खासदार प्रफुल पटेल यांनी सांगितले.