पक्षश्रेष्ठींनी म्हटले तर प्रदेशाध्यक्षपद सांभाळण्यास तयार-नाना पटोले

0
15

नागपूर,दि.27 : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.त्या पार्श्वभूमीवर बोलतांना  कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींनी जर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली तर ती स्विकारण्याची आपली तयारी असल्याचे वक्तव्य कॉंग्रेस नेते व माजी खासदार नाना पटोले यांनी केले आहे.कॉंग्रेसच्या नेत्यांवर निवडणूक कामात अडथळे आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.त्या पार्श्वभूमीवर आज सोमवारला आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते.यावेळी पत्रपरिषदेला कॉंग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे यांच्यासह अभिजीत वंजारी, अतुल लोंढे हेदेखील उपस्थित होते.

लोकसभा निवडणूकीत नितीन गडकरी यांच्याकडून पराभूत झालो तर राजकीय संन्यास घेईल,य़ा घोषणेबाबत पटोले म्हणाले की तो माझा केवळ ‘जुमला’च होता. भाजपचे लोक संन्याशांना राजकारणात आणतात आणि मी एकदा पराभूत झालो तर संन्यास घ्यायला सांगतात. मी राजकीय संन्यास घेणार नाही, असे त्यांनी सांगितले. गडकरी व भाजप नेते यांनी आतापर्यंत १०० जुमले केले होते. मी जर एक जुमला केला तर काय बिघडले, असेही पटोले म्हणाले.यावेळी नाना पटोले यांनी राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना ‘फोकनाड’ असे म्हणून त्यांच्यावर टीका केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नितीन गडकरी यांनी भंडारा-गोंदियातून निवडणूक लढवून दाखवावी, असे आवाहन पटोले यांनी दिले.
निवडणूकीत अडथळा केल्याप्रकरणी नागपूरचे जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी आमच्यावर गुन्हा दाखल केला आहे. मात्र मुद्गल व जिल्हा प्रशासनाने निवडणूक काळात आमच्यासोबत दुजाभाव केला. आम्हाला ईव्हीएमची तपासणी करुन दिली नाही. मतदार यादी उशीरा दिली. पटोले यांनी मुद्गल यांना न्यायालयात खेचणार असल्याचे सांगितले.
पटोले यांनी वंचित बहुजन आघाडीवरदेखील टीका केली. भाजप, आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रचार साहित्य सारखेच होते. त्यातूनच वंचित आघाडी भाजपची ‘टीम बी’ असल्याचे दिसून येत आहे. वंचित बहुजन आघाडीच्या मागे ‘मास्टरमाईंड’ कोण आहे याच विचार करावा, असे नाना पटोले म्हणाले.