तातडीने लोकायुक्त नियुक्त करण्याची काँग्रेसची मागणी

0
11

मुंबई : गेली चार दशके महाराष्ट्रात नियमितपणे लोकायुक्तांच्या नेमणुका होत आल्या आणि लोकायुक्तांनी नियमाप्रमाणे कारभार केला. लोकायुक्तांचे पद राज्यात कधीच रिक्त राहिले नाही. तर शेजारच्या गुजरातमध्ये सलग १२ वर्षे हे पद रिक्त ठेवण्याची परंपरा नरेंद्र मोदींच्या काळात निर्माण झाली. दुर्दैवाने राज्यातील फडणवीस सरकार याच मार्गावरून जाण्याच्या प्रयत्नात आहे. गेले सात महिने लोकायुक्तांचे पद रिक्त असून, ते तातडीने भरण्याची मागणी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

मुंबई काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना निरुपम म्हणाले की, नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात सलग १२ वर्षे गुजरातमध्ये लोकायुक्तच नेमण्यात आले नव्हते. न्यायालयीन हस्तक्षेपानंतर नाइलाजाने हे पद भरण्यात आले. महाराष्ट्रात मात्र नियमितपणे लोकायुक्तांच्या नेमणुका झाल्या. तांत्रिक कारणांमुळे केवळ अपवादात्मक परिस्थितीतच राज्यात लोकायुक्त नव्हते. फडणवीस सरकार सत्तेवर येऊन सात महिने झाल्यानंतरही लोकायुक्तांची नेमणूक झाली नाही. तसेच उप लोकायुक्तांचेही पद रिक्त आहे. राज्यात ताबडतोब लोकायुक्त नेमण्याची मागणी निरुपम यांनी केली. या वेळी समाजवादी पक्षातील काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला.