आरएसएसच्या अजेंड्यापासून सतर्क राहा

0
6

मुंबई दि.४- केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून देशभरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा राबविण्याची प्रक्रिया सुरू असून, राज्यातील जनतेने त्यापासून सतर्क राहण्याचे आवाहन कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी आज केले. कॉंग्रेसच्या गांधी भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी आमदार भाई जगताप, प्रवक्‍ते सचिन सावंत आदी उपस्थित होते.

दोन दिवसांपूर्वी मद्रास येथील आयआयटीमधील डॉ. आंबेडकर पेरियार स्टडी सर्कलवर केंद्र सरकारने बंदी घातली. काही दिवसांपूर्वी मुंबईतील सेंट झेवियर्स महाविद्यालयाच्या प्राचार्यांचा आवाजही दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला. गोवंश हत्याबंदी असो किंवा घरवापसीसारख्या घटनांच्या मुद्यावर सरकारने कुणाशीही चर्चा न करता हे निर्णय जनतेवर लादले. यावरून केंद्र आणि राज्य सरकार आरएसएसचा अजेंडा राबवत असल्याचे दिसून येते, अशी टीका अशोक चव्हाण यांनी केली.

धनगर समाजाला आरक्षण देण्यावर ठाम असल्याचे मुख्यमंत्री म्हणत असले, तरी त्यांच्या सरकारमधील आदिवासी विकासमंत्री आरक्षणाला विरोध करत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणी चव्हाण यांनी केली. मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली असली, तरी ज्या 24 हजार गावांत पन्नास पैशापेक्षा कमी आणेवारी आली आहे त्या सर्वांनाच कर्जमाफी देण्याची कॉंग्रेसची मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.