जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशींनी केली सिमेंट नाला बंधारा कामाची पाहणी

0
14

गोंदिया,दि.४ : राज्य शासनाचा महत्वाकांक्षी कार्यक्रम असलेल्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत तिरोडा तालुक्यातील चांदोरी आणि गोरेगाव तालुक्यातील चिलाटी या गावाजवळील नाल्यावर बांधण्यात येत असलेल्या सिमेंट नाला बंधाऱ्याच्या कामाला जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी ३ व ४ जून रोजी भेट देऊन पाहणी केली.
सिमेंट नाला बंधाऱ्याच्या कामात वापरण्यात येणाऱ्या सिमेंटचे नमूने तपासणी करुन योग्य असल्याची खात्री करुनच त्याचा वापर करावा तसेच काळी कठीण गिट्टी व चांगल्या प्रतिच्या वाळूचाच बंधाऱ्याच्या कामात वापर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित कंत्राटदारांना यावेळी दिले. सिमेंट नाला बंधारा बांधतांना उत्तम दर्जाचा असावा असे कंत्राटदाराला यावेळी त्यांनी सांगितले.
सिमेंट नाला बंधाऱ्याच्या बांधकामामुळे नाल्यात दूरपर्यंत पाणी अडवून भूगर्भात पाण्याची साठवणूक होण्यास बंधारे उपयुक्त ठरणार आहे. सिंचनासाठी देखील या बंधाऱ्यातील पाण्याचा वापर बंधाऱ्या शेजारच्या शेतीला सिंचनासाठी होणार आहे असेही जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले. त्यांच्यासमवेत तिरोडा उपविभागीय अधिकारी प्रवीण महिरे, तिरोडा तालुका कृषी अधिकारी श्री.पोटदुखे व गोरेगाव तालुका कृषी अधिकारी मंगेश वावधने यावेळी उपस्थित होते.