भाजप छुपा अजेंडा राबवतेय-अजित पवार

0
5

नागपूर दि.९:: राज्यात आघाडीची सत्ता असताना शेतकऱ्यांच्या आत्महत्यावरून ३०२ चा गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजप नेते करीत होते. परंतु भाजप-शिवसेना युतीच्या सात महिन्याच्या राजवटीत राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहे. दुबार पेरणीचे संकट असूनही शेतकऱ्यांना मदत नाही. राज्यात भ्रष्टाचार बोकाळला आहे. कायदा व सुव्यवस्था ढासळल्याने लोकांच्या मनात असुरक्षिततेची भावना आहे. अशा जनहिताच्या प्रश्नावरून १३ जुलैपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सरकारला जाब विचारणार असल्याचा इशारा राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिला.

जिल्हाध्यक्षांची निवड करण्यासाठी विदर्भातील इच्छुकांच्या रविभवन येथे मुलाखती घेण्यात आल्या. यावेळी विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री जयंत पाटील, अनिल देशमुख, मनोहर नाईक, रमेश बंग आदी उपस्थित होते. लोकांना अच्छे दिन येणार असल्याचे स्वप्न दाखवून सत्तेवर आलेल्या भाजप नेतृत्वातील सरकारने जनतेचा भ्रमनिरास केला आहे.

केंद्र व राज्य सरकारमधील दिग्गज नेत्यांची भ्रष्टाचाराची नवनवी प्रकरणे पुढे येत असल्याने त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. चौकशीत निर्दोष आढळल्यास पुन्हा पदावर यावे. भाजपचा मित्र पक्ष असलेल्या शिवसेना नेत्यांना भ्रष्टाचार बोकाळाल्याचे दिसत आहे. सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सरकारचे धिंडवडे काढल्याचे त्यांनी सांगितले.

आघाडी सरकारच्या काळात कापूस व धानाला भाव दिला होता. परंतु भाजप सरकारला यात अपयश आले आहे.दुधाचे भाव २५ रुपयावरुन १६ रुपयावर आले आहे. पाण्यापेक्षा दूध स्वस्त झाल्याने दूध उत्पादक चिंतेत आहे. त्यातच राज्यात दुबार पेरणीचे असूनही शेतकऱ्यांना पीक कर्ज न मिळाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजप नेत्यांना डोक्यावर घेतलेल्या विदर्भातील जनतेचा भ्रमनिरास झाला आहे. म्हणूनच . भंडारा व गोंदिया जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मतदारांनी त्यांना नाकारल्याचे पवार म्हणाले. सुरुवातीला आम्ही सरकारवर टीका केली नाही. सहा महिने संधी दिली. परंतु सरकारला सर्वच क्षेत्रात अपयश आल्याचे पवार म्हणाले.