लोकांना फसवता येणार नाही – उद्धव ठाकरे

0
13

वृत्तसंस्था,
मुंबई,दि. २३- देशात मजबूत सरकार आले आहे. पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांच्याकडून लोकांच्या मोठ्या अपेक्षा आहेत. लोकांचा विश्वास आता तुटता कामा नये, कामाचा वेग वाढवावा लागेल. अच्छे दिनाचा वायदा असून, लोकांना फसवता येणार नाही, अशी खोचक टीका शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

उद्धव ठाकरे यांनी आज (गुरुवार) ‘सामना‘ या वृत्तपत्राला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी आपला मित्रपक्ष असलेल्या भाजपला लक्ष्य केले आहे. सामनामधून अनेकवेळा भाजपवर टीका करण्यात येते. आज उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र व देशातील राजकीय घडामोडींवर भाष्य केले आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘देशात मजबूत सरकार आले आणि लोकांनाही मोदींकडून मोठ्या अपेक्षा आहेत. मात्र, लोकांचा विश्वास तुटता कामा नये आणि त्यासाठी कामाचा वेग वाढवावा लागेल. राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीच्या मागणीवर आपण ठाम आहे. कर्जमाफी ही चुकीचे असून, माफी गुन्हेगारांना दिली जाते. त्यामुळे शेतकरी हा काय गुन्हेगार वाटतो का? देशात व राज्यात सरकारे बदलली आहेत. पण, लोकांचा संयम सुटण्यापूर्वी कामांना वेग द्या.‘‘

सरकार बदलले तरी काश्मीरमध्ये पाकिस्तानी झेंडे फडकतात कसे. राष्ट्रहिताशी कुठलीही तडजोड न करता पाकिस्तानचा मुकाबला करा. राज्यात येऊन युतीचे राजकारण पुरे करा असे सांगणाऱ्या भाजपाध्यक्षांना काश्मीरमध्ये पाकधार्जिण्या पक्षासोबत युती कशी चालते? हे आश्चर्यकारक आहेच. माझ कुणाशी वैयक्तिक भांडण नाही. पण मुफ्ती मोहम्मद सईद यांच्याविषयी आपली मत आधी काय होती? त्यांचे काय राजकारण होते? हे कसे विसरता येईल, असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे.