जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध- पालकमंत्री बडोले

0
20

गोंदिया,दि.१५ : केंद्र व राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना आहेत. या योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करुन जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिली. भारतीय स्वातंत्र्याच्या ६८ व्या वर्धापन दिनाचे मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री बडोले यांनी कारंजा पोलीस कवायत मैदान येथे केले. याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करतांना पालकमंत्री बडोले बोलत होते.
जिल्ह्याचे पालक सचिव डॉ.पी.एस.मीना, जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती उषा मेंढे, आमदार गोपालदास अग्रवाल, जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे, पोलीस अधीक्षक शशीकुमार मीना, जि.प.आरोग्य व शिक्षण समिती सभापती पी.जी.कटरे, गोंदिया पंचायत समिती सभापती स्नेहा गौतम, जिल्हा परिषद सदस्य सीमा मडावी, भाजपा जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, सन २०१४-१५ या वर्षात नैसर्गिक आपत्तीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांनी घेतलेल्या अल्प मुदत कर्जाचे मध्यम मुदतीच्या कर्जात रुपांतर करण्यात येईल. जलयुक्त शिवार अभियानात यंत्रणा आणि लोकसहभागातून जिल्ह्यातील ९४ गावात ९१६ कामे पूर्ण करण्यात आली आहे. त्यामुळे भूगर्भातील पाणी साठ्यात वाढ होऊन शेतकऱ्यांना संरक्षित सिंचनाची व्यवस्था निर्माण झाली आहे.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती देशभर सामाजिक न्याय व समता वर्ष म्हणून साजरी करण्यात येणार असल्याचे सांगून पालकमंत्री बडोले म्हणाले, राज्य सरकारने यासाठी १२५ कोटीची तरतूद केली आहे. बार्टीमार्फत राज्यातील ५० विद्यार्थ्यांना युपीएससीच्या मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी दिल्ली येथे पाठविण्यात आले आहे. समाजातील वंचित,दुर्लक्षित,उपेक्षित व मागास घटकांना विकासाच्या मुख्‍य प्रवाहात आणण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.
सावकारी कर्जमाफी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील २७४५ शेतकऱ्यांना लवकरच सावकारी कर्जातून मुक्त करणार असल्याचे सांगून पालकमंत्री पुढे म्हणाले, जिल्ह्यातील बँकांनी खरीप हंगामात १३४ कोटी ५३ लक्ष रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे. अटल पेंशन योजना, जीवन ज्योती योजना व पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले.
गोंदिया, भंडारा व गडचिरोली जिल्ह्यासाठी वीज वितरण कंपनीच्या मुख्य अभियंत्याचे कार्यालय गोंदिया येथे लवकरच सुरु होणार असल्याचे सांगून ते म्हणाले, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना जिल्ह्यातील मजूरांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासोबतच त्यांची आर्थिक व सामाजिक स्थिती सुधारण्यास महत्वपूर्ण ठरली आहे. जिल्ह्यातील पर्यटन स्थळांचा विकास करुन जास्तीत जास्त स्थानिकांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचा आपला प्रयत्न असल्याचे सांगून जिल्ह्यात आरोग्य सेवेच्या माध्यमातून जागतिक दर्जाच्या शिर्ष सेवा भविष्यात उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही पालकमंत्री बडोले यांनी यावेळी दिली. स्वातंत्र्य दिनाच्या ज्येष्ठ नागरिक, विविध विभागाचे प्रमुख अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.