भारताचा विजयोत्सव, दक्षिण आफ्र‍िकेला 22 धावांनी हरवले

0
8

वृत्तसंस्था
इंदूर, दि. १४ – कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या शानदार खेळीमुळे आणि गोलंदाजांच्या कामगिरीमुळे दुस-या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेवर २२ धावांनी विजय मिऴवला. या सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेसमोर जिंकण्यासाठी २४८ धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र भारतीय संघाच्या गोलंदाजीसमोर दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजाना २४८ धावांचा पल्ला गाठता आला नाही. दक्षिण आफ्रिकेने ४३.४ षटकात २२५ धावा केल्या.
दक्षिण आफ्रिकेकडून फलंदाज फाफ डू प्लेसिसने सर्वाधिक ५१ धावा केल्या, त्याला अक्षर पटेलने झेलबाद केले. तर, एबी डिव्हिलियर्स (१९), हाशिम अमला (१७), क्विंटन डिकाक (३४), जेपी ड्युमिनी (३६), डेव्हिड मिलर (०),
फरहान बेहारदिन (१८), इम्रान ताहिर (९), डेल स्टेन (१३), मोर्नी मोर्कल (४) तर कागिसो रबादाने नाबाद १९ धावा केल्या.
भारतीय गोलंदाज अक्षर पटेल आणि भुवनेश्वर कुमारने तीन बळी टिपले, तर, हभजन सिंगने दोन आणि उमेश यादव व मोहित शर्मा यांनी प्रत्येकी एक-एक बळी टिपला.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेणा-या भारतीय संघाचा फलंदाज रोहित शर्मा अवघ्या ३ धावांवर बाद झाल्याने संघाला पहिला धक्का बसला आणि त्यानंतर भारताची पडझड सुरूच राहिली. मात्र अजिंक्य रहाणेने ५१ धावांची खेळी करत भारताचा डाव सावरला. भारतीय संघ २०० धावाही करू शकेल की नाही अशी भीती वाटत असताना कर्णधार महेंद्रसिंग धोनीने नाबाद ९२ धावांची शानदार खेळी करत २४८ धावांचे आव्हान ठेवले. या सामन्यात रोहित शर्मा (३), धवन (२३), कोहली (१२), रैना (०), अक्षर पटेल (१३), भुवनेश्वर कुमार (१४), हभजन सिंग (२२) आणि उमेश यादवने ४ धावा केल्या. तर दक्षिण आफ्रिकेकडून गोलंदाज डेल स्टेनने ३, मॉर्केल व ताहिरने प्रत्येकी २ आणि रबाडाने १ बळी टिपला.