संगणक परिचालकांचे जिल्हा परिषदेत ठिय्या आंदोलन

0
6

गडचिरोली, ता.९: थकीत मानधन देऊन कामावरुन कमी केलेल्या संगणक परिचालकांना तत्काळ कामावर रुजू करुन घ्यावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी संगणक परिचालक संघटनेच्या वतीने आज(ता.९) जिल्हा परिषदेत ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी परिचालकांनी जिल्हा परिषदेची साफसफाई करुन शासकीय लेटलतीफशाहीचा निषेधही केला.
जिल्हाभरात सुमारे ४५० संगणक परिचालक असून, ते २०११ पासून कार्यरत आहेत. ग्रामपंचायतींच्या दस्तऐवजांची ऑनलाईन नोंद करणे, योजनांची माहिती अपडेट करणे इत्यादी कामे हे परिचालक करीत असतात. अनेक ग्रामपंचायतीमध्ये इंटनेटची सुविधा उपलब्ध नाही. अशावेळी इंटरनेट उपलब्ध असलेल्या ठिकाणी स्वखर्चाने जाऊन परिचालक दस्तऐवजांची ऑनलाईन नोंद करतात. मात्र जिल्हा समन्वयक परिचालकांना अतिरिक्त काम करा, अन्यथा कामावरुन कमी करु, अशी धमकी देतात. बरेचदा महिला परिचालकांना शिवीगाळही करतात, असा आरोप संगणक परिचालकांनी केला. बहुतांश परिचालकांना ऑक्टोबर २०१४ पासूनचे मानधन देण्यात आले नाही. ४१०० रुपये मानधन असताना कधी २५००, तर कधी ३००० रुपये दिले जातात. या परिचालकांनी २०११ मध्ये झालेल्या सामाजिक व आर्थिक जनगणनेचे कामही केले होते. आता ही जनगणना पूर्ण होऊन त्यावर आक्षेप मागविण्याचे काम सुरु झाले असताना परिचालकांना एक रुपयाही मोबदला देण्यात आला नाही. त्यामुळे त्रस्त झालेल्या सुमारे ४०० परिचालकांनी आज जिल्हा परिषदेत येऊन स्वच्छता अभियान राबवून ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर मुख्य कार्यपालन अधिकारी संपदा मेहता यांना निवेदन देऊन चर्चा केली. संगणक परिचालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष मुकेश नामेवार, उपाध्यक्ष नाहिद पठाण, सचिव संदीप बुरमवार,सुखसागर झाडे, डंबाजी कोसरे, प्रकाश तिजारे आदींच्या नेतृत्वात सर्वच तालुक्यांतील संगणक परिचालक या आंदोलनात सहभागी झाले होते.