जलयुक्त शिवार अभियान आता लोकसहभागातून राबविणार

0
16

अभियान होणार लोकचळवळ
जलयुक्त शिवार अभियान हा राज्य शासनाचा अत्यंत महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे. राज्यात वारंवार उद्भवणाऱ्या पाणीटंचाईवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी हा कार्यक्रम सन २०१४-१५ या वर्षापासून राज्यात राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून राज्यातील ५ हजार गावे दरवर्षी टंचाईमुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करुन दुष्काळमुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकारण्यासाठी पारदर्शकते सोबतच कामाची गुणवत्ता राखण्यातही शासन अत्यंत दक्ष आहे.
जलयुक्त शिवार अभियानाला आणखी गतीमान करण्यासाठी यावर्षापासून अभियानात सहभागी होण्यास ज्या ग्रामस्थांनी उत्सूकता दाखविली आहे. तसेच या कार्यक्रमासाठी लोकवाटा प्रत्यक्ष जमा केला आहे. अशा गावांना आता या अभियानात सहभागी होता येणार आहे. यावर्षीपासून लोकसहभाग आणि लोकवाटा हे निकष लावल्यामुळे जिल्हयातील अनेक गावे पाणीटंचाईवर मात करण्यासोबतच संरक्षित सिंचनासाठी पाणीसाठे तयार करण्याकरीता पूढाकार घेतील. जलसाक्षरतेचे महत्व या अभियानाच्या माध्यमातून ग्रामस्थांना समजण्यास मदत होईल.
सन २०१४-१५ या अभियानाच्या पहिल्या वर्षात जिल्हयातील ९४ गावाची निवड या अभियानासाठी करण्यात आली. यामध्ये सर्वाधिक २४ गावे गोंदिया तालुक्यातील आणि सर्वात कमी प्रत्येकी ४ गावे आमगाव व अर्जुणी मोरगाव तालुक्यातील निवडण्यात आली होती. या गावांमध्ये साठवण बंधारे, नालाखोलीकरण, बोडी दुरुस्ती, शेततळे, नाल्यातील गाळ काढणे, सिमेंट नाला बांध बाधणे, तलावांचे खोलीकरण, भातखाचरांची दुरुस्ती, नाला सरळीत करणे, ठिबक सिंचन, तुषार सिंचन, गावबोडी दुरुस्ती, केटीवेअर दुरुस्ती, वनतलावर खोलीकरण, गॅबियन बंधारे, माजी मालगुजारी तलाव दुरुस्ती, माती नाला बांध बांधणे, सलग समतलचर तयार करणे व बंधारा दुरुस्तीची १ हजार ५८ कामे हाती घेण्यात आली. त्यापैकी सप्टेंबर २०१५ अखेर ८३० कामे पूर्ण करण्यात आली.
जलयुक्त शिवार अभियानात ज्या गावाचा लोकसहभाग आणि लोकवाटा राहणार आहे त्या गावांची जलसमृध्दीकडे वाटचाल होण्यास मदत होईल. हे अभियान सर्वात मोठी लोकचळवळ म्हणून ओळखली जाईल. गाव शिवारातील पाणी गावातच साठवून भूपृष्ठावरील आणि भूगर्भातील जलपातळीत वाढ होण्यास मोठा हातभार लागणार आहे. निर्माण होणाऱ्या जलसाठयांमुळे कृषि उत्पादनात वाढ होऊन शेतकऱ्यांना दिलासा मिळेल.
येत्या पाच वर्षात २५ हजार गावे टंचाईमुक्त करण्यासाठी आणि गावोगावी जलसमृध्दी आणण्यासाठी लोकसहभाग आणि लोकवाटा महत्वाचा ठरणार आहे. गावागावातील नागरिक या अभियानात मोठ्याप्रमाणात सहभागी होत आहे. शाश्वत सिंचन-समृध्द जीवन हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वप्न या अभियानातून निश्चितच पूर्ण होईल.