खोसेटोल्यात आली दूधगंगा,दररोज १३२० लिटर दूधाचे संकलन

0
5

८८ जर्सी व होस्टन दूधाळ गायीचे वाटप
महिन्याकाठी दूधापासून ७ लक्ष ९२ हजाराचे उत्पन्न

गोंदिया दि. १५ –-धान उत्पादक जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदिया जिल्हयातील शेतकरी धानाचे पारंपारीक आणि आधुनिक पध्दतीने पिक घेतात. अनेक शेतकऱ्यांनी नगदी पिकाचा मार्ग अवलंबिला असून काही गावातील शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसायाची निवड केली आहे.यातच गोरेगाव तालुक्यातील खोसेटोला या गावाने तर धानशेतीसोबतच आपल्या गावात दुग्धक्रांती घडवून आणली आहे.मांडोदेवी देवस्थानाच्या शेजारी असलेल्या आणि खासगी कृषी महाविद्यालयाला लागून असलेल्या या गावाने समृध्द होण्यासोबतच दुग्धक्रांतीमध्ये आपल्या गावाला स्मार्ट बनविण्यास कुठलीही कसर सोडली नाही.
गोरेगाव तालुक्यातील खोसेटोला हे १६३ उंबरठ्याच ८०९ लोकवस्तीचे गाव. गावातील मुख्य व्यवसाय शेती. गावातील २९४ हेक्टर क्षेत्र हे पिकाखाली आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत कोरडवाहू शाश्वत शेतीचा कार्यक्रम खोसेटोल्यात प्रभावीपणे राबविण्यात आला. खोसेटोल्यातील ६८ शेतकऱ्यांना कृषी विभागाने ५० टक्के अनुदानावर ८८ जर्सी आणि होस्टन जातीच्या दुधाळ गायीचे वाटप केले. खोसेटोल्यातील बहुतांश शेतकरी खरीपाच्या हंगामात पावसाच्या पाण्यावर अवलंबून धान शेती करतात. या शेतकऱ्यांच्या शेतीला जोड मिळाली ती दुग्ध व्यवसायाची.
परिश्रम करण्याची तयारी असली की यश नक्की मिळतं, हे सिध्द करुन दाखविलं इथल्या शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसायातून. गावातील शेतकरी कुटूंबातील प्रत्येक सदस्याने स्वत:ला गुंतवून घेतले आहे ते शेती आणि दुग्ध व्यवसायात. एका गायीपासून इथला शेतकरी दोन्ही वेळेच सरासरी १५ लिटर दूध घेतो. तीन सहकारी आणि दोन खाजगी अशा पाच संस्था दुध संकलनाचे काम करतात. दुधाला प्रति लिटर २० रुपये दर ह्या संस्था देतात. दररोज १३२० लिटर दुधाचे संकलन खासेटोल्यात करण्यात येते. २६ हजार ४०० रुपयांचे उत्पन्न दररोज तर महिन्याकाठी ७ लक्ष ९२ हजार रुपयांचे उत्पन्न खोसेटोल्यातील शेतकऱ्यांना दूधापासून मिळते. एका गायीच्या दूधापासून महिन्याकाठी ९ हजार रुपयाचे उत्पन्न होत असून चाऱ्यासाठी महिन्याला तीन हजार रुपये खर्च वजा जाता महिन्याकाठी ६ हजार रुपये शुध्द नफा एका गाईपासून शेतकऱ्यांना मिळत आहे.
पाळीव दुधाळ जनावरांपासून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात शेणखत उपलब्ध उपलब्ध होत असल्यामुळे शेतीसाठी नियमित शेणखताचा वापर होत आहे. रासायनिक खताचा वापर फारच कमी प्रमाणात करण्यात येत आहे. शेणखताच्या वापरामुळे पिकांची उत्पादन क्षमता वाढली आहे. रासायनिक खताचा वापर करण्यात येत नसल्यामुळे शेतकऱ्यांचा मोठा खर्च वाचला आहे.
खोसेटोल्यातील शेतकऱ्यांनी शेती आणि दुग्ध व्यवसायाला वाहून घेतल्यामुळे गावातील आबालवृध्द व्यसनापासून दूर आहेत. गावात प्रवेश करतेवेळी साधी पानटपरीसुध्दा दिसत नाही. दुधाळ जनावरांच्या आहार व आरोग्याकडे खोसेटोल्यातील शेतकऱ्यांचे विशेष लक्ष आहे. कारण ती कामधेनू आहे. भविष्यात दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढवून खोसेटोल्याची सामाजिक व आर्थिक प्रगतीचा ध्यास इथल्या शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसायाच्या बळावर धरला आहे.

विवेक खडसे
जिल्हा माहिती अधिकारी,गोंदिया