कारंजात क्षेत्रीय किसान गोष्टी कार्यक्रम

0
6

गोंदिया : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) सन २0१५-१६ अंतर्गत तालुका कृषी कार्यालयामार्फत कृषी चिकित्सालय कारंजा येथे मंगळवारी क्षेत्रिय किसान गोष्टी कार्यक्रम पार पडला.
अध्यक्षस्थानी जिल्हा कृषी पणन तज्ज्ञ विशाल शिंदे तर अतिथी म्हणून कृउबासचे संचालक आनंदराव तुरकर, शेतकरी सल्लागार समितीचे अध्यक्ष सुनिता भाजीपाले, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सुनील खडसे, ढाकणीचे ऋषिकेश टेंभरे उपस्थित होते. मार्गदर्शक म्हणून नितीन रहांगडाले उपस्थित होते.
यावेळी सुनील खडसे यांनी क्षेत्रिय किसान गोष्टी कार्यक्रमाचे महत्व सांगत शेतीसमूह गटामार्फत धानाची पॅकिंग व मार्केटिंग कशी करावी, घरगुती कुक्कुटपालन कसे करावे, तसेच धान व भाजीपाला पिकांबद्दल मार्गदर्शन केले.
झिलमिली येथील प्रगतशील महिला शेतकरी सुनिता धनिराम भाजीपाले यांनी सेंद्रीय शेतीद्वारे केळी व लवकी पिकाचे अधिक उत्पादन कसे घेतले, यावर आपले अनुभव सांगितले. ऋषिकेश टेंभरे यांनी केळी व भाजीपाला, जीवणलाल चौधरी यांनी फूलशेती, गोपालकृष्ण ठाकूर चुलोद यांनी वांगी पीक, ढाकणीचे रमेश भगत यांनी मका व बटाटा पीक व सेंद्रीय शेतीबद्दल आपल्या अनुभव व्यक्त केले. याप्रसंगी नितीन रहांगडाले यांनी इज्राईलची प्रगतीशील शेती, सेंद्रीय शेती व तांत्रिक पद्धतीने भाजीपाला लागवड करून जास्तीत जास्त उत्पादन कसे घ्यावे, याबाबत मार्गदर्शन केले. तसेच धान व भाजीपाला पिकांवर येणारे रोग व कीड यांचे प्रतिबंध कसे करावे, यावर मार्गदर्शन करीत शेतकर्‍यांच्या प्रश्नांचे समाधानही केले.
जिल्हा कृषी पणन तज्ज्ञ शिंदे यांनी शेती समूह गट व महासमूह गटामार्फत शेतकरी उत्पादक संघ तयार करून शेतकर्‍यांनी शेती आधारित उद्योग करून शेतकर्‍यांची प्रगती कशी होईल व महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पामार्फत राबविण्यात येणार्‍या विविध योजनांची माहिती दिली. आभार शैलेश बिसेन यांनी मानले.