२५७९२ हेक्टर सुरक्षित सिंचन क्षमता निर्माण

0
9

लोकसहभागातून काढला २ कोटी ६४ लक्ष रुपयांचा गाळ
जिल्हयातील ९४ गावांची निवड
१०५८ कामांचे उद्दिष्ट, ८३० कामे पूर्ण
गोंदिया दि, २ : पिण्याच्या पाण्यापासून तर शेतीच्या सिंचनापर्यंत महाराष्ट्र जलसंकटात सापडला आहे. जलसमस्येवर कायमस्वरुपी मात करण्यासोबत सिंचनासाठी शाश्वत जलसाठे निर्माण करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान हा महत्वांकाक्षी कार्यक्रम राबविण्यात येत असून जिल्हयातील ९४ गावांची निवड पहिल्या टप्प्यात करण्यात आली आहे. प्रत्येक नागरिक त्या दृष्टीने जलसाक्षर होत असून जलसमृध्दीतून आर्थिक समृध्दीकडे जाण्यासाठी आता या अभियानाला लोकचळवळीचे स्वरुप प्राप्त झाले आहे.
जिल्हयात या अभियानात १०५८ कामे करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले. त्यापैकी ८३० कामे पूर्ण करण्यात आली. विविध तलाव, नाले, साठवण बंधारे, बोडीतील २ कोटी ६४ लक्ष रुपयांचा गाळ लोकसहभागातून काढण्यात आला आहे. जलयुक्त शिवार अभियानातून विविध जलसंधारणाची कामे करण्यात आली. या कामातून २५७९२ हेक्टर ऐवढी मोठी सुरक्षित सिंचन व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे.
या अभियानाअंतर्गत सलग समतल चर, माती नाला बांध, मजगी दुरुस्ती, गॅबियन पध्दतीचे बंधारे, शेततळे, सिमेंट नाला बांध, बांधणे तसेच दुरुस्ती करणे, साखळी सिमेंट बंधारा नाला खोलीकरण व सरलीकरण, केटी वेअर, तलावातील गाळ काढणे, ठिबक सिंचन, तुषार सिंचन, वन तलाव, भात खाचरे दुरुस्ती, साठवण बंधारे, बोडी खोलीकरण/जुन्या बोडी दुरुस्ती, तलाव खोलीकरण/तलाव दुरुस्ती, माजी मालगुजारी तलाव दुरुस्ती, लघू पाटबंधारे तलाव दुरुस्ती अशी एकुण १०५८ कामे होती घेण्यात आली. त्यापैकी ८३० कामे पूर्ण करण्यात आली. यावर २६ कोटी ९८ लाख ५५ हजार रुपये खर्च करण्यात आले आहे. श्री साईबाबा संस्थान शिर्डी आणि श्री सिध्दीविनायक गणपती मंदिर, प्रभादेवी मुंबई यांच्याकडून प्रत्येकी १ कोटी रुपये जलयुक्त शिवार अभियानासाठी जिल्हयाला मिळाले आहे.

जलयुक्त अभियानातील ९४ गावांपैकी ५२ गावात लोकसहभागातून कामे करण्यात आली. यामध्ये शासकीय कामे १११ आणि ६२ कामे लोकसहभागातून करण्यात आली. लोकसहभागातून १ लाख ११ हजार ६०० घनमीटर गाळ काढण्यात आला. ३ लाख ११ हजार ४०० घनमीटर गाळ अभियानातून काढण्यात आला. शासकीय यंत्रणांकडून ३ कोटी ३१ लक्ष रुपये आणि लोकसहभागातून २ कोटी ६४ लक्ष रुपये असा एकूण ५ कोटी ९५ लक्ष रुपयांचा गाळ काढण्यात आला. पूर्ण झालेल्या कामातून निर्माण झालेला जलसाठा १८ हजार ५४ सहस्त्र घनमीटर आहे. जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कामातून २५ हजार ७९२ हेक्टर एवढी मोठी सुरक्षित सिंचन क्षमता निर्माण झाली आहे.

जलसमृध्दीची लोकचळवळ या अभियानातून पुढे आली आहे. गावशिवारातील पाणी गावातच साठविल्यामुळे जमीनीवरील आणि भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. शाश्वत जलसाठा निर्माण होण्यास मदत झाली आहे. जलयुक्त शिवार अभियानातून तयार झालेल्या जलसाठ्यामुळे कृषी उत्पादन क्षमता वाढली आहे. दुबार पिक घेण्यास या अभियानाचा महत्वाचा हातभार शेतकऱ्यांना लागला आहे. उत्पादन क्षमतेत झालेली वाढ व दुबार पिक घेता येत असल्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होत आहे. शेतकऱ्यांवरचे कर्जाचे ओझे काही प्रमाणात कमी होण्यास जलयुक्त अभियानाचा हातभार लागणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरदृष्टीने अभियानावर लक्ष केंद्रीत केल्यामुळे येत्या ५ वर्षात राज्यातील २५ हजार गावे टंचाईमुक्तीकडे वाटचाल करतील. जलयुक्त शिवार अभियान हे जलसमृध्दीतून आर्थिक समृध्दीकडे राज्याला नक्कीच घेऊन जाईल एवढं मात्र निश्चित.